वटपौर्णिमा : पौराणिक माहात्म्याचा महिलांवर पगडा अधिक; औषधी गुणधर्मामुळेहीे होते वडाचे संवर्धन खामगाव : आपला हिरवा पर्णसंभार सांभाळत, एखाद्या ज्ञानी आजोबांसारखा किंवा सन्यस्थ ऋषीसारखा पारंब्यांची दाढी कुरवाळत एकतरी वटवृक्ष लोकवस्तीत असतोच. हा वटवृक्ष वाटसरूंना सावली देणारा, गावातील चावडीवरच्या गप्पांचा साक्षीदार होणारा आणि आपल्या पुढे मानवाच्या अनेक पिढ्या वाढताना बघणारा आहेच, पण तो महिलांसाठी खास "आधारवड"च आहे. त्यामुळे मघा नक्षत्रात पौर्णिमेला सर्वच महिला विशेषत: सुवासिनी वडाला धागा बांधून त्याचे पूजन करतात. वटपौर्णिमेचा दिवस जसा महिलांसाठी सौभाग्याचा, तसाच वटवृक्षासाठीही अत्यंत भाग्याचा. वषार्तून केवळ एकदाच पुजला जाणारा हा वृक्ष इतर वेळी मात्र दुर्लक्षित राहतो. सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळाल्याने ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्रीने ज्याप्रमाणे सत्यवानासाठी व्रत करून त्याचे प्राण परत मिळविले, अशी पौराणिक मान्यता आहे. महिला त्याप्रमाणेच वटसावित्री व्रत आचरतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीला स्मरून आयुष्य वाढविण्यासाठी याचना करतात.पूजा व सूत गुंडाळण्याचे पौराणिक महत्त्व! वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात, असा समज आहे. ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सूत गुंडाळले जाते, त्यावेळी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील तत्त्वांच्या संयोगामुळे लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात, असेही मानले जाते. वटवृक्षाचे दीर्घ आयुष्य असल्याने महिला पतीच्या दीघार्युष्यासाठी पूजा करतात.
"आधारवडा"भोवती उसळणार आस्थेची गर्दी
By admin | Updated: June 7, 2017 13:39 IST