मेहकर : स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा करुन जम्मू व काश्मीरमधील पुरग्रस्तांना मदत केली. विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.जम्मू व काश्मीरमध्ये आलेल्या महापुराने अनेकजण मृत्यूमुखी पडले. तर अनेक कुटूंब उध्वस्त झाले. संकटाच्या अशा परिस्थितीत देशातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जम्मू व काश्मीर मधील पुरग्रस्तांना मदत देण्यासाठी येथील राजश्री प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच संस्थेतील सर्व विभागातील कर्मचार्यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन पुरग्रस्तांना आर्थिक मदत केली. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क आपल्या खाऊचे पैसे या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केले. यामध्ये जमा झालेल्या ८५0 रुपयांचा धनादेश पंतप्रधान राष्ट्रीय फंडच्यानावे काढण्यात आला. सदर धनादेश शिक्षक व विद्यार्थ्यांच्या तहसिलदार निर्भय जैन यांच्याकडे देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी शाळेत राबविलेल्या या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांनी कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय फंगाळ, अजिंक्य बार्डेकर, कु.सोनल देशमुख, शिवप्रसाद शेळके, गणेश निकस, विकास भोसले आदींनी परिश्रम घेतले.
खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना मदत
By admin | Updated: September 17, 2014 00:52 IST