खामगाव : सकाळी चहा, नास्त्याची दुकाने उघडण्यापूर्वीच निर्धारित वेळेचे उल्लंघन करुन दारूची दुकाने उघडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काही ठिकाणी दुकाने बंद असतानाही दारूचे पार्सल मिळत असून काही दुकानांच्या परिसरात चोरट्या मार्गाने दारूची विक्री केली जात असल्याचे आज १८ सप्टेंबर रोजी लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. शहरी तसेच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दारूच्या दुकानांना काही नियम घालून देण्यात आले आहेत. नियमानुसार सकाळी १0 ते रात्री १0 पर्यंत सर्वच परवानाधारक दुकानदारांना दारू विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, स्पर्धेपोटी शासन नियम धाब्यावर बसवून जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये खुलेआम दारू विक्री केल्या जात असल्याचे चित्र आहे. लोकमतने एकाच दिवशी सकाळी ६.३0 ते ९.५0 वाजेपर्यंतच्या कालावधीत घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावांसोबतच तालुक्यातील काही मोठय़ा गावांमध्ये आज स्टिंग ऑपरेशन राबविले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.जळगाव जामोद शहरात देशी दारू विक्रीची ४ दुकाने आहेत. यापैकी आज सकाळी एक दुकान बाहेरून बंद तर आतून सुरू असल्याचे दिसून आले. सकाळी ७.१५ वाजता जयस्वाल नामक परवानाधारकाच्या दुकानातून ग्राहकांना दारूची विक्री करण्यात आली. नांदुरा येथील पाच दुकानांपैकी एका दुकानात निर्धारित वेळेच्या आधी दारु विक्री खुलेआम सुरु होती.
वेळेआधीच उघडतात दारूची दुकाने
By admin | Updated: September 19, 2014 23:04 IST