लोकमत न्यूज नेटवर्कसोनाळा : अंबाबरव्हा अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना पुनर्वसनापोटी १० लाख रुपयांचा मोबदला शासनाकडून मिळत असल्याने त्यावर अनेक जण डल्ला मारताना दिसत आहेत. भोळ्या-भाबड्या आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेण्यासाठी अनेक जण सरसावले असून, आदिवासींचे बँकेचे पासबुक चक्क व्यापाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे दिसत आहे.सोनाळा गावालगत ७ किलोमीटर अंतरावर अंबाबरव्हा अभयारण्य आहे. या अभयारण्याला मानवी वस्तीपासून अलिप्त करण्यासाठी अभयारण्यातील दऱ्या-खोऱ्यात वसलेल्या शेंबा व गुमटी या दोन आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरविले आहे. या गावात न्याल, भिलाला, कोरकू जमातीचे आदिवासी राहत असून, ते शिक्षणापासून व अन्य मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना शासनाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांचा मोबदला पुनर्वसनापोटी देण्यात येत आहे. मागिल मार्च महिन्यातच शासनाने या गावातील रहिवाशांना प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य १० लाख रुपयांचा मोबदला देण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी नगदी ५० हजार रुपये देऊन अडीच लाख रुपये बँक खात्यात जमा केले होते. तर उर्वरित रक्कम टप्प्या-टप्प्याने खात्यात जमा केली जात आहे. यामध्ये दर १५ दिवसाला ५० हजार रुपये दिले जात आहेत. जवळपास ५१० आदिवासींचा या पुनर्वसित लोकांच्या यादीत समावेश आहे. अशिक्षित आदिवासींना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याचे पाहून अनेक जण त्याचा गैरफायदा घेत आहेत. काहींनी २० हजाराची मोटारसायकल आदिवासींना ८० हजारात विकली, तर काही जण आदिवासींना १०० रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेत उधारीचे व्यवहार करीत आहेत. यावेळी त्यांचे पासबुकही ताब्यात घेतले जात आहे. ज्यावेळी आदिवासींच्या खात्यात पैसे जमा होतात, त्यावेळी हे व्यापारी व दलाल त्यांना आपल्या मोटारसायकलवर बसवून बँकेत घेऊन जातात व पैसे काढून घेतात. पैसे मिळण्याच्या दिवशी सोनाळा-अकोट मार्गावर अशा अनेक गाड्या धावताना दिसतात. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडणाऱ्यांची टोळीच सक्रिय झालेली असून, याकडे सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.दरमहा ३० टक्के शेकड्याने दिले जातात पैसे गरीब आदिवासींची गरज पाहून व त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार असल्याचे ठाऊक असल्याने काही अवैध सावकार त्यांना चक्क ३० टक्के दरमहा व्याजाने पैसे देत असल्याची माहिती आहे. अनेक जण १०० रुपयांच्या स्टॅम्पवर उधारीचे व्यवहार करीत आहेत. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेण्यासाठी अनेक जण टपून बसलेले आहेत. यामध्ये सोनाळा, सायखेड, पिंगळी, टुनकी, निमखेडी, आलेवाडी, लाडणापूर, बावणबीर येथील दलाल सक्रिय झालेले आहेत. याबाबत चौकशी करण्याची गरज आहे.
आदिवासींचे पासबुक व्यापाऱ्यांच्या ताब्यात!
By admin | Updated: June 13, 2017 00:02 IST