शारा ( जि. बुलडाणा) : बारावीचा निकाल लागल्याने पेढे घेण्यासाठी येथील दोन मित्र ऑटोरिक्षाने लोणारकडे जात असताना गावाच्या काही अंतरावर एका ट्रॅक्टरने त्यांच्या ऑटोरिक्षाला जबर धडक दिल्याची घटना २७ मे रोजी रात्री उशिरा घडली. या अपघातात एकाने आपला आवाज गमवला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. लोणार तालुक्यातील शारा येथील सुमित उत्तमराव डव्हळे (१९) याने शिवाजी हायस्कूलच्या विज्ञान शाखेतून १२ वीच्या परीक्षेत ६२ टक्के गुण घेत उत्कृष्ट यश संपादन केले. मित्राने १२ वीची परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण केल्यामुळे सुमितचा मित्र विष्णू कुंडलीक डव्हळे याने त्याला पेढा खाऊ घालण्याची मागणी केली. १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे आनंदात असलेल्या सुमित हा मित्राला पेढा खाऊ घालण्यासाठी त्याच्याच एम.एच.३६ ए.३८४६ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने शारा येथून लोणारकडे निघाला. गावापासून काही अंतरावर येताच समोरून येणार्या एम.एच.२८ टी.५३८३ क्रमांकाच्या एका ट्रॅक्टरने त्यांच्या ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. अपघातात विष्णू डव्हळे याचा गळा कापल्या गेल्याने त्याच्या अन्ननलिकेला तडा गेला. यामुळे विष्णूचा आवाज गेला असून, गंभीररित्या जखमी झालेल्या विष्णूला गावकर्यांनी उपचारासाठी अकोला येथील एका रुग्णालयात दाखल केले आहे. तर १२ वीची परीक्षा पास केल्यामुळे आनंदात असलेला सुमितही या अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पेढे घेण्यासाठी जाणा-या मित्रांचा अपघात
By admin | Updated: May 29, 2015 01:39 IST