महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशनच्या वतीने १ ते ३ सप्टेंबर रोजी रॉयल गार्डन कर्जत रायगड येथे झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमधील ३५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या खेळाडूंमधून पिंच्याक सिलाट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आरती खंडागळे हिने राज्यस्तरीय सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे. या अगोदरही आरतीने पिंच्याक सिलाट स्पर्धेत उत्कृष्ट काम करून भरघोस सुवर्णपदकासह अन्य पदकांचीही कामगिरी केली आहे. तसेच हरियाणा व जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आरतीची निवड करण्यात आली असून, तिने केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे भारतीय पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशनचे सचिव किशोर येवले, महाराष्ट्राचे टेक्निकल डायरेक्टर संकेत धामंदे, क्रीडा शिक्षक प्रवीण राठोड यांनी आरतीचे अभिनंदन केले. पिंच्याक सिलाट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट्स प्रकारचा खेळ असून, भारत देश व महाराष्ट्रभर हा खेळ वाढवण्यासाठी इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले प्रयत्न करत असून, या खेळाला भारतीय क्रीडा मंत्रालयाने मान्यता देत राखीव नोकरी भरतीसाठी हा खेळ समाविष्ट केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेद्वारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे प्रस्ताव पाठवला असून, काही दिवसांनी हा खेळ सर्व शालेय स्तरावर खेळला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना या खेळात सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत आरती खंडागळेची सुवर्ण कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST