अंढेरा (जि.बुलढाणा) : दारू पकडण्यासाठी पाठलाग करणाऱ्या पाेलिसांच्या दुचाकीला अवैध दारू विक्रेत्याने लाथ मारली. त्यामुळे भरधाव दुचाकी अनियंत्रित हाेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. यामध्ये एक पाेलिस कर्मचारी जागीच ठार झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना २३ मार्च राेजी दुपारी मिसळवाडी ते शेळगाव आटाेड रस्त्यावर घडली. या प्रकरणी अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी आराेपीला गजाआड केले आहे.
अंढेरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी रामेश्वर आंधळे आणि भागवत गिरी हे २३ मार्च राेजी एमएच २८ एच १६०९ ने बिटमध्ये गस्त घालत हाेते. त्यांना अवैध देशी दारूचे बॉक्स वाहून नेणाऱ्या वाहनाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. पाठलागाच्या दरम्यान आरोपीने पाेलिसांच्या दुचाकीला लाथ मारल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती झाडाला धडकली. या भीषण अपघातात भागवत गिरी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रामेश्वर आंधळे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अंढेरा पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार सुरेश जारवाल आणि देळगाव राज्याच्या एसडीपीओ मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी चिखली येथे उपचार घेत असलेल्या पोलिस कर्मचारी रामेश्वर आंधळे यांची विचारपूस केली.एलसीबीने केली आराेपीस अटकघटनेची माहिती मिळताच, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी एलसीबी टीमला कार्यवाहीसाठी निर्देश दिले. एलसीबीच्या टीमने तातडीने तपास करून आरोपी संजय शिवणकर याला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.