धाड : धाड व परिसरातील जवळपास ४७ गावांचा कारभार पाहण्यासाठी केवळ ३१ कर्मचारी उपस्थित असल्याने या भागात विजेच्या समस्या मार्गी लागण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालय धाड अंतर्गत ४७ गावांचा समावेश येतो. तर धाड, धामणाव, चांडोळ, रायपूर याठिकाणी पाच ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रे आहेत. शासनाकडून या विभागात लाईनमन, तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ तसेच लाईन ऑपरेटर अशी पदे वीज कार्यालयात निर्माण करुन वीज ग्राहकांना वेळेत सुरळीत वीज पुरवठा, तात्काळ तक्रारी निवारण, आपत्कालीन सेवा, कृषी, पाणी पुरवठा यासह वीज बिल वसुली यासारखी कामे सुरळीत होऊन समस्या मार्गी लावण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. अंदाजे २५ कि.मी. च्या परिघात असणार्या ४७ गावांना, सर्व स्तरावर कामासाठी आवश्यक असणार्या शासन स्तरावरुन ५८ जागा याठिकाणी आहेत. पैकी आजरोजी केवळ ३१ कर्मचारी कार्यरत असल्याने या भागात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होताना दिसत नाही. बहुतांश रात्री दरम्यान उद्भवणार्या तक्रारी ह्या त्याच वेळेत सुटत नसून दोन-दोन दिवस नागरिकांना छोट्या-छोट्या समस्येवरुन अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे. धाड उपविभागात असणार्या पाच ३३/११ केव्ही उपकेंद्रांतर्गत ३५ तंत्रज्ञ पैकी १६ तंत्रज्ञ हजर आहे. तर १८ कनिष्ठ तंत्रज्ञ पैकी १0 कनिष्ठ तंत्रज्ञ हजर आहे. तसेच १६ लाईन ऑपरेटर पैकी केवळ ५ लाईन ऑपरेटर हजर असल्याने याठिकाणी दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत असून या भागात या-ना त्या कारणावरुन अनेकदा वीज पुरवठा खंडीत होतो आहे. ग्रामीण पाणी पुरवठय़ाच्या जोडण्या, कृषी क्षेत्रावर असणार्या जोडण्या व त्याठिकाणी सातत्याने ट्रान्सफार्मरमध्ये होणारे बिघाड वा इतर तक्रारी अनेक दिवस मार्गी लागताना दिसत नाहीत. आज रोजी धाड वीज वितरण कंपनीच्या उपविभागात १७ हजारावर घरगुती वीज जोडण्या आहेत तर ९ हजार कृषी पंप, १ हजार व्यापारी वापराच्या, २५0 चे वर औद्योगिक तर ७२ सार्वजनिक पाणी पुरवठय़ाच्या अशा २७ हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी वीज वितरण जवळ ३१ कर्मचारी संख्या हजर आहेत. पैकी धाड, चांडोळ, रायपूर हे गावे २0 हजार लोकसंख्येची असून प्रत्येकवेळी पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत वीजेचा होणारा पुरवठा कोलमडून नियोजन कोसळते. भरीसभर ग्रामीण भागात वीज बिलात असणार्या प्रचंड चुका पाहता बहुतेक तक्रारी ह्या ह्याबाबत राहतात मात्र प्रत्यक्षात वीज कर्मचारी उपलब्ध नसल्याने ह्या तक्रारींचे योग्य निरसन होताना दिसत नाही. तर परिणामी वीज बिलाची वसुलीवर ह्याचा परिणाम होत आहे. व वीज ग्राहकांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनी केवळ आपल्या आर्थिक लाभासाठी ग्रामीण जनतेस वेठीस धरुन त्यांना त्रास देत आहे. या परिसरात छोट्या-छोट्या विजेच्या तक्रारीसाठी दिवसेंदिवस ह्या कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ नागरिकांवर आहे. परिणामी वीज ग्राहकांना बरेच कामे खाजगी व्यक्तींकडून पैसा भरुन करुन घ्यावे लागत आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरुन तात्काळ कार्यवाही होऊन येथे कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
४७ गावांचा कारभार ३१ कर्मचार्यांवर
By admin | Updated: July 7, 2014 22:40 IST