चिखली : चिखली तालुक्यातील भानगखेड येथे ४ दिवसांपूर्वी २०० देशी कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण 'बर्ड-फ्लू'च असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पशुविभागाने शिघ्र कृती दलाची स्थापना केली आहे.
भानखेडे येथील आणखी ४४ पक्ष्यांना २६ जानेवारीला दयामरण देवून पक्ष्यांसह २० अंड्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. भानखेड येथील शेतकरी जनार्दन इंगळे यांच्या शेतातील सुमारे २०० देशी कोंबड्यांचा २३ जानेवारीला अकस्मात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर तालुका पशुधन अधिकारी डॉ. दांडगे, पशुवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ. युवराज रगतवान, पशुधन पर्यवेक्षक डॉ.प्रवीण निळे, व डॉ.पूनम तायडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. काही कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान, या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी तत्काळ या परिसरातील खबरदारीचे उपाय व सर्वेक्षणाचे काम १० कि.मी. त्रिज्येच्या परिसरात करून योग्य उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले आहे. या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी रोजी जिल्हा पशु उपायुक्त पी. जी. बोरकर, पं.स.पशुधन विकास अधिकारी (वि) डॉ. दांडगे व संबंधित विभागाच्या चमूने गावात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाबाबत माहिती दिली. गावात सर्व्हेक्षण केले असता सुमारे ४४ पक्षी संधिग्द स्थितीत आढळल्याने ८ पशुपालकांच्या ४४ पक्ष्यांना दयामरण देण्यात आले. यावेळी ग्रा.पं.सचिव ए.बी.जाधव, तलाठी बाहेकर, पोलीस पाटील मिलिंद इंगळे, पशू विभागाचा चमू तसेच पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
भानखेड येथील कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत
सुमारे १५२० लोकसंख्येच्या भानखेडे येथे कुक्कुटपालन व्यावसायिक शेतकरी बहुसंख्येने आहेत. याअंतर्गत अंडी देणारे सुमारे १ हजार ८८६ कोंबड्या, २ हजार २०० तितर, ४ हजार २०० मांसल पक्षी आणि ११० कबुतरे असे एकूण ८ हजार २९६ पक्ष्यांची संख्या आहे. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने येथील कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आलेली ठिकाणे
पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू (अवैन इनफ्ल्यूएंझा) रोगाची लागण झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी चिखली तालुक्यातील भानखेडसह, संग्रामपूर, लोणार तालुक्यातील रायगाव आणि मेहकर तालुक्यातील मादणी या ठिकाणी सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.