पळसखेड दौलत येथील उमेश गायकवाड हे १० जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी ज्योती उमेश गायकवाड व आई-वडील घरी होते. १० जानेवारीच्या रात्री ज्योती गायकवाड यांना झोपेतून अचानक जाग आल्याने त्या आपल्या सासू-सासरे झोपलेल्या हॉलमध्ये आल्या असता त्यांना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या उशाला बसलेला दिसून आला. तेव्हा संशय आल्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता, एक चोर त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना शस्त्राचा धाक दाखवत गप्प राहण्यास सांगितले. दरम्यान, आरडाओरड होताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. तत्पूर्वी चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून हॉलमध्ये असलेल्या कपाटातील २ लाख ८५ हजारांची रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचे ज्योती गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांच्या शेजारी राहणारे मदन गायकवाड यांच्या घरातदेखील चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत तपासकामी श्वानपथकाला पाचारण करून तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय अधिकारी रमेश बरकते हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास करीत तपास पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शस्त्रांचा धाक दाखवून ४.३२ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST