बुलडाणा : उमेदवारी अर्ज मागे घेणे व चिन्ह वाटपाची शेवटची तारीख १ आक्टोबर राहणार असून, याच तारखेला ४८ तासात पोस्टल बॅलेट पेपर पोस्टाद्वारे पाठविण्याचे सक्त आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होणार आहे.उमेदवाराचे नामांकन दाखल करण्याला २0 सप्टेबरपासून सुरुवात झाली आहे. २७ पर्यंत अर्ज दाखल होऊन २९ सप्टेबरला अर्जाची छाननी होणार आहे. तर १ आक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हाचे वाटप होईल. ही प्रक्रिया साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत चालेल. चिन्ह वाटप झाल्यानंतर लगेच पुढील ४८ तासात पोस्टल बॅलेट पेपर डिस्पॅच करावे लागणार आहेत. जिल्ह्यात ३ हजार ९८९ सैनिक मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सैनिकी मतदारांची संख्या ३ हजार ८८३ एवढी होती. यामध्ये वाढ होऊन हा आकडा जवळपास ४ हाजारावर गेला आहे. चिन्ह वाटप झाल्यानंतर लगेच मतपत्रिका छापून त्या पोस्टाद्वारे पाठविण्यासाठी निवडणूक विभागाला ही प्रक्रिया अत्यंत घाईगर्दीने करावी लागणार आहे.कारण निर्धारित वेळेच्या आत हे काम होणे आवश्यक आहे. या ४ हजार मतपत्रिका पोस्टाद्वारे पाठविण्यासाठी निवडणूक विभागाला १ लाख ४0 हजार रुपये खर्च येणार आहे. हा पैसा नगदी स्वरूपात निवडणूक विभागाला पोस्टात भरावा लागणार आहे.
४८ तासात करणार ४ हजार बॅलेट ‘पोस्ट’
By admin | Updated: September 21, 2014 00:39 IST