खामगाव: भगवान विठ्ठलाच्या आषाढी एकादशीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी खामगाव आगारातून ३६ बस सोडण्यात आल्या आहेत. या सर्व जादा गाड्या पंढरपूर येथे मुक्कामी असून, या जादा गाड्यांच्या माध्यमातून खामगाव आगाराला ४ जुलैपर्यंत २, २२, ६८० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.आषाढी एकादशीला पायी वारी करू न शकणारे भाविक रेल्वे आणि इतर प्रवासी साधनांचा वापर करून पंढरपूर गाठतात. तथापि, रेल्वेत आरक्षण अथवा जागा न मिळणारे भाविक एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे पंढरपूर यात्रेनिमित्त एसटीवरदेखील भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत, एसटी महामंडळाच्या खामगाव आगाराकडून पंढरपूर यात्रा विशेष बसगाड्यांचे नियोजन केले जाते. यावर्षीही खामगाव आगारातून ६१ गाड्यांचे नियोजन केले होते. २६ जुलैपासून अतिरिक्त बस खामगाव येथून पंढरपूरकडे सोडण्यात आल्या. दरम्यान, १, २ आणि ३ जुलै रोजी खामगाव आगारातून ३६ गाड्या सोडण्यात आल्या. या सर्व गाड्या पंढरपूर येथे मुक्कामी आहेत. भाविकांच्या परतीचीही सोय!पंढरपूर यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची गावाकडे परतताना गैरसोय टाळण्यासाठी खामगाव आगाराने पंढरपूर येथे ३५ गाड्या मुक्कामी ठेवल्या आहेत. या गाड्या मंगळवारी दुपारपासून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे यात्रेसाठी गेलेल्या भाविकांना परतीचीही सुविधा खामगाव आगाराने उपलब्ध करून दिली आहे.आषाढी यात्रेसाठी खामगाव आगारातून मोठ्या प्रमाणात गाड्या सोडण्यात आल्या. यापैकी ३६ गाड्या पंढरपूर येथे मुक्कामी असून, यात्रा संपताच या गाड्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.- अ.का. इंगळे,आगार व्यवस्थापक, खामगाव.
खामगाव आगाराच्या ३६ एसटी गाड्या पंढरपुरात
By admin | Updated: July 5, 2017 00:16 IST