खामगाव: पावसाअभावी यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. ज्या शेतकर्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा शेतकर्यांनी कपाशीची लागवड केली आहे. तुषार व ठिबक सिंचनाव्दारे या पिकांना जगवण्याचे प्रयत्न शेतकर्याकडून केले जात असले तरी वीज भारनियमनामुळे मात्र आता पश्चिम विदर्भातील २२ हजार हेक्टरवरील पिकेही संकटात आहेत. गतवर्षी झालेला समाधानकारक पाऊस व फेब्रुवारी-मार्च महिन्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाल्याने यावर्षी काही भागात अद्याप जलसाठा तग धरून आहे. मात्र महिनाभरापासून पावसाचा थेंबही नसल्याने ही जलाशय पातळी घसरली आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोरडा गेला तर आद्र्रा नक्षत्रही कोरडे जाण्याची भिती आहे. यामुळे शेतकर्यावर पेरणीचे फेरनियोजन करण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकर्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकर्यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कपाशीची लागवड केली. ठिबक व तुषार सिंचनाव्दारे पाणी दिले जात असून हवेत डोलणारी ही पिके जगविण्यासाठी बळीराजा धडपडत आहे. अशातच विज वितरण कंपनीकडून कृषीपंपासाठी पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याने या पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. अगोदरच एक दिवसाआड वीज पुरवठा होत आहे. मात्र त्यातही कधी ह्यब्रेकह्ण मिळेल, याची शाश्वती नसल्याने शेतकर्यांना २४ तास वीज पुरवठय़ाकडे लक्ष देवून कपाशीला पाणी द्यावे लागत आहे. ठिबक व तुषार सिंचनावर उपलब्ध सिंचन सुविधेमध्येही बागायती शेती वीज भारनियमनाने धोक्यात आली आहे. अगोदर अस्मानी तर आता सुलतानी संकटाने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
२२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
By admin | Updated: July 6, 2014 23:32 IST