हर्षनंदन वाघ / बुलडाणा : निर्मल ग्राम योजनेचे नाव बदलण्यात आले असून, आता हगणदरीमुक्त ग्रामपंचायतची संकल्पना पुढे आली आहे. या संकल्पनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायती हगणदीमुक्त झाल्या असून, २ ऑक्टोबरपासून या ग्राम पंचायतींतर्गत उत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने निर्मलग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबांसाठी शौचालय उभारून खर्या अर्थाने गाव निर्मल करण्याचा उद्देश होता. या योजनेंतर्गत अनेक गावांनी निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त केला होता; मात्र निर्मल ग्राम योजनेचे नाव बदलविण्यात आले असून, आता हगणदरीमुक्त ग्रामपंचायत संकल्पना पुढे आली आहे. हगणदरीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत यावर्षी सन २0१५-१६ अंतर्गत २१ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर, मोताळा तालुक्यातील निपाना, जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बु., गाडेगाव खु., पळसखेड, झाडेगाव, नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी, वसाडी खु., खामगाव तालुक्यातील निळेगाव, संग्रामपूर तालुक्यातील रूधाना, उकळी बु., वकाना, मलकापूर तालुक्यातील दुधलगाव खु., मोरखेड बु., शिरधोन, शेगाव तालुक्यातील बेलुरा, रोकडिया नगर, कठोरा, येऊलखेड, मेहकर तालुक्यातील वागदेव व सिंदखेडराजा तालुक्यातील शिवनीटाका व वसंतनगर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येणार्या काळात जिल्ह्यात हगणदरीमुक्त ग्रामपंचायतीत वाढ होणार असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
२२ ग्रामपंचायती झाल्या हगणदरीमुक्त
By admin | Updated: October 7, 2015 23:35 IST