खामगाव (बुलडाणा) : नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील १७ अनधिकृत फलक बुधवार २५ फेब्रुवारी रोजी जप्त करण्यात आले. तर एका बोर्डधारकावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील अनधिकृत फलक, बॅनर आणि बोर्डधारकांविरोधात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने कारवाई केल्या जात आहे. या कारवाईअंतर्गत नगर परिषद अतिक्रमण विभागाचे मोहन अहीर, अनंत निळे, जाधव यांनी बुधवारी शहरात अनधिकृत फलक निर्मूलन मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत फरशी, मुख्य रस्ता, महावीर चौक, गांधी चौक, शहर पोलीस स्टेशन, नांदुरा रोड, जलंब नाका तसेच चिखली रोडवर फलक काढण्यात आले. हे फलक काढल्यानंतर पालिका प्रशासनाने जप्त केले असून, फलकधारकांना कायदेशीर नोटीस बजावल्या आहेत. नगर परिषदेचे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहीर यांनी शहरातील अनधिकृत फलक हटविण्यासाठी नगरपालिकेने मोहीम सुरू केली असल्याचे स्पष्ट करून या मोहिमेंतर्गत बुधवारी १७ फलकधारकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगीतले.
खामगावातील १७ फलक जप्त
By admin | Updated: February 27, 2015 01:17 IST