कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्याचे शासन व प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
ग्रामस्तरावर स्थानिक ग्रामपंचायतीकडून प्रभावी उपाययोजना करून सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, वारंवार साबणाने हात धुणे याबाबत जनजागृती करून लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. राज्यात १ एप्रिलपासून कोविड लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. लसीकरण मोहीमअंतर्गत २२ एप्रिल रोजी देऊळगाव कुंडपाळ येथील जिल्हा परिषद शाळेत ४५ वर्षांवरील १०४ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. लस देण्याचा शुभारंभ सरपंच शेषराव डोंगरदिवे यांच्यापासून करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी किसन राठोड, प्रल्हाद जायभाये, ग्रामसेवक लक्ष्मण जायभाये, आरोग्य सेवक देबाजे, आरोग्य सेविका सानप, आशा सेविका शितल वायळ, इंगळे, अंगणवाडी सेविका शालू राठोड, कुसुम इंगळे, उषा सरकटे, सरपंच शेषराव डोंगरदिवे आदी हजर होते. उर्वरित नागरिकांचे लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक जायभाये यांनी दिली. लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी शिपाई अनंता वाढणकर, आत्मारात खरात, संगणक चालक लक्ष्मण सरकटे, मदतनीस राठोड, खरात आणि डोंगरदिवे यांनी परिश्रम घेतले.