संग्रामपूर : विनापरवाना रेतीचा उपसा करीत असल्याचे आढळल्याने १0 ट्रकचालकांवर आज कारवाई करण्यात आली. सदर ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले. ही कारवाई तहसीलदार काझी व त्यांच्या पथकाने आज केली. गेल्या अनेक दिवसांपासून वानखेड गावालगत वान नदी पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेती नेल्या जात आहे. मोठमोठे खड्डे खोदल्या जात असल्याची ओरड स्थानिक ग्रामस्थ करीत असल्याने यामुळे नदीचे पात्र बदलून धोका होऊ शकतो, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या भागातील नागरिकांची तक्रार लक्षात घेऊन आज महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्रात जाऊन पाहणी केली. जवळपास १0 ट्रकद्वारे नदीपात्रातून विनापरवाना रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने सदर ट्रक जप्त करून तहसील कार्यालय परिसरात लावले. या कारवाईमुळे दिवसभर रेती व्यवसाय करणार्यांची तहसील परिसरात गर्दी झाली होती. या पथकात तहसीलदार काझी यांच्यासह नायब तहसीलदार दाभाडे, तलाठी परिहार, करे आदी सहभागी झाले होते. शासनाने हरासीतून दिलेला घाट सोडून हे ट्रकवाले इतरत्र भागातून रेतीचा विनापरवाना उपसा करीत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत सदर ट्रकचालकांवर कारवाई सुरू होती.
रेती वाहतुकीचे १0 ट्रक जप्त
By admin | Updated: September 16, 2014 18:30 IST