उसर्रा : मासेचोरीला प्रतिबंध घालण्यासाठी शेतातील तलावाच्या तीरावर वीज प्रवाहित तारा लावल्याने मासेमारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा तुमसर तालुक्याच्या उसर्रा येथे मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याला आंधळगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
कन्हैयालाल खुशाल शरणागते (५५), रा. उसर्रा असे अटकेतील शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी गावातीलच महेंद्र उमाशंकर पुराम (२८) याचा संशयास्पद मृतदेह एका शेतात आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नातेवाइकांनी चौकशीची मागणी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा वास्तव पुढे आले.
कन्हैयालाल याने आपल्या शेतातील तलावात मच्छीपालन केले आहे. मासोळ्या चोरीस जाऊ नये म्हणून तलावाच्या चारही बाजूंना लाकडी खुंट्या ठोकल्या. त्याला सेंट्रिंग तार बांधून त्यात वीजप्रवाह सोडला होता. महेंद्र रविवारी रात्री मासेमारीसाठी या तलावात गेला होता. त्याला विजेचा जबर धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र, प्रकरण अंगावर येईल म्हणून शेतकरी कन्हैयालालने महेंद्रचा मृतदेह ओढत लगतच्या कोठीराम शरणागते यांच्या शेतातील गवतामध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांच्या तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर मंगळवारी सायंकाळी कन्हैयालालला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंवि ३०४, २०१, १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार एस.सी. मट्टामे करीत आहेत.