तुमसर : गुढीपाढव्याचे औचित्य साधून येथील महिलांच्या उडान परिवारातर्फे व लोकमत सखी मंचच्या सहकार्याने शहरातील विविध भागातून महिलांची रैली काढण्यात येवून मराठी नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. रैलीत महिलांनी परिधान केलेली मराठमोळी वेशभूषा रैलीचे मुख्य आकर्षण बनले.चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढिपाडवा सणापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होत असते. त्या मराठी नववर्षाचे मोठया जल्लोषात साजरा करण्याचा विडा तुमसरातील महिलांच्या ‘उडाण’ परिवाराने घेतला. तुमसर शहरात मराठी नवर्षाचे स्वागत करण्याकरिता महिलांनी मराठी वेशभूषा परिधान करुन ढोलतांशाच्या गजरात स्थानिक दुर्गा मंदिर परिसरातून बावनकर चौक ते गोंविद मेडिकल्स, बजाज नगर व परत दुर्गामंदिर अशी महिलांची महारॅली काढण्यात आली होती. गोंदिया येथील समाज सेविका प्रा. सुनीता धरमशहारे, ज्योती लुनिया, आशा पाटील यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. त्याच बरोबर रॅलीत हिंदू महिला सोबत मुस्लीम महिलांनीही सहभाग नोंदवून सर्वधर्म समभावाचाही रॅलीद्वारे संदेश देण्यात आला. महिलांनी रॅली दरम्यान दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिकेही सादर केली. कार्यक्रमासाठी उडानचे संस्थापक अध्यक्षा कल्याणी भूरे, रितू पशिने, उज्ज्वला मेश्राम, पमा ठाकूर, गीता कोंडेवार, सविता ठाकूर, प्राची पटले, अल्का देशमुख, मीना गाढवे, विजया चोपकर, अनिता गुलरवार, नीतू चौधरी, सुजान देशमुख, अल्का देशमुख, कांचन पडोळे, करुणा धुर्वे, ललिता शहारे, दुर्गा भुरे, लुमिशा टेंभरे, लीना हरणे, मिर्जा बेग यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
तुमसरात महिलांची रॅली
By admin | Updated: April 9, 2016 00:28 IST