साकोली : साकोली येथील पोलीस ठाणे येथे जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.प्रमुख वक्ते म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव मुलचंद कुकडे, महिला जिल्हा संघटीका प्रिया शहारे, अ.भा. अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डी.जी. रंगारी, किर्ती गणवीर, साकोली शाखेचे अध्यक्ष प्रा.प्रोफेसर बहेकर तसेच याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत बुरडे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर आदी उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यावर प्रिया शहारे, किर्ती गणवीर, मुलचंद कुकडे, डी.जी. रंगारी यांनीही मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना मान्यवर म्हणाले, जादूटोणा विरोधी कायदा अत्यंत महत्वपूर्ण कायदा २०१३ पासून अमलात आणला. महाराष्ट्र शासनाने हा कायदा केल्यामुळे महाराष्ट्र राज्य हे भारतातील एकमेव व पहिले राज्य ठरले. महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा आणि भोंदू लोकांकडून केले जाणारे जादूटोणा व भूत पिशाचाचे प्रयोग यामुळे होणारे शोषण व हानी टाळता येते. जादूटोणा विरोधी कायद्यातील कलमातील अनुसूची मधील नमूद केलेल्या कृती प्रत्यक्ष करणे किंवा त्याचे प्रसार, प्रचार व ते करण्यास प्रत्यक्ष सहकार्य करणे या कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध दखलपात्र व अजामीनपात्र असतात. या कायद्यानुसार अपराधी असणारी व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर सहा महिन्याहून कमी नसेल व परंतु सात वर्षापर्यंत असू शकेल, इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पाच हजार रुपयापेक्षा कमी नसेल व पन्नास हजार रुपयापर्यंत एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरते. त्याबरोबरच तोंडातून लांब पोकळ नळी व ब्लेड काढणे, माचिसचा उपयोग न करता अग्नी पेटविणे, पत्त्याचा रंग बदलविणे, पेटता कापूर खाणे, लिंबूमधून धागा काढणे इत्यादी वेगवेगळे वैज्ञानिक प्रात्यक्षिके दाखवून त्यामधील सत्यता समजावून सांगितला. संचालन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर यांनी केले. आभार हवालदार ग्यानीराम गोबाडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता देवेंद्र खडसे, हवालदार स्वप्नील भजनकर, मुकेश गायकवाड आणि कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
जादूटोणा विरोधी कायद्यावर कार्यशाळा
By admin | Updated: January 12, 2016 00:42 IST