महसूल दिन कार्यक्रम : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादनसाकोली : महसूल प्रशासनात काम करणे म्हणजे लोकांची सेवा करण्याची सुवर्णसंधी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केले. दि. १ आॅगस्ट रोजी साकोली उपविभाग अंतर्गत महसूल दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. १ आॅगस्ट हा संपूर्ण महाराष्ट्रात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तलाठी लेखे अद्यावत केले जातात. तसेच पीक पाहणी व जमाबंदी (पैसेवारी निश्चित करण्याचे) काम होते. जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी सुवर्ण जयंती राज्य अभियानाला नवीन स्वरुप प्राप्त झाले असून त्याला महाराजस्व अभियान असे नाव देण्यात आले आहे असे सांगितले. प्रशासनात रोज बदल होत आहे. होणाऱ्या बदलाप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांनी नवीन तंत्रज्ञाने शिकून लोकसेवा करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी यावेळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विकसीत भारताचे जे स्वप्न होते त्याबाबत बोलताना सांगितले की, विकास साधायचा असेल तर सर्वांनी आपले काम प्रामाणिकपणे करणे जरूरी आहे. सामान्य नागरिक व समाजातील शेवटच्या घटकाला जलदगती कशी सेवा देता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. यावेळी शासनाने लागू केलेल्या सेवा हमी कायदा २०१५ बाबत चर्चा करण्यात आली व या कायद्यामुळे सामान्य नागरिकांना कसा फायदा होईल व अध्रिारी कर्मचारी यांनी कोणती तयारी करणे आवश्यक आहे त्याबाबत सांगितले. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वीस हजार रुपयाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान झालेल्या लोकांना धनादेश देण्यात आले व राशन कार्डाचे सुद्धा वाटप करण्यात आले. शेवटी तहसील कार्यालयातर्फे कर्मचारी जे.एस. मेटांगे, डी.बी. डोंगरे, बी.टी. हटवार, एस.के. कारेमोरे, मधु नंदूरकर, लोकचंद गजभिये, पवन चौंडीये व उत्कृष्ट काम करणाऱ्या बी.एल.ओ. आर.एन. मडावी, एन. के. कापगते, आर.बी. बोरकर यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. उपविभागीय अधिकारी डी.पी. तलामले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्रस्तावना तहसीलदार डॉ.हंसा मोहने यांनी केली तर आभार प्रदर्शन लाखांदुरचे तहसीलदार विजय पवार यांनी केले. कार्यक्रमात नायब तहसीलदार डी.बी. खोत, अनिल पवार व अश्विनी जाधव आणि उपविभागाचे सर्व कर्मचारी तलाठी व मंडळ अधिकारी, कोतवाल व नागरिक यांनी सहभाग दर्शविला. (तालुका प्रतिनिधी)
महसूल प्रशासनात काम करणे म्हणजे लोकसेवा
By admin | Updated: August 3, 2015 00:31 IST