शेतकरी भूमिहीन : बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षाभंडारा : महत्त्वाकांक्षी भेल कंपनीचे काम साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथे सुरु आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम सुरु असून अजूनही पूर्णत्वास आले नाही. या कंपनीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शेती विकल्या. त्यामुळे संथगतीने काम सुरु असल्यामुळे परिसरात बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असून शेतकरी भूमिहीन झाले आहेत.विदर्भाचा महत्त्वाकांक्षी भेल व सौरउर्जा प्रकल्याचे १४ मे २०१३ ला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत या भेल कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी परिसरातील नागरिकांना या कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे आश्वासन दिले होते. मात्र भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असतानाही प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. पूर्व विदर्भाचा भेल व सौर ऊर्जा प्रकल्प लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मंद गतीने काम सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विदर्भातील बेरोजगार युवकांना या कंपनीत काम मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रकल्पाचे काम मंदगतीने असल्याने बेरोजगारांची आशा धुसर होत आहे. या प्रकल्पासाठी परिसरातील नागरिकांनी जमिनी विकल्या. सध्या ते भूमिहीन झाले असून नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या त्यांच्या परिवारातील व्यक्तीला नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रही देण्यात आलेले नाही. त्यामुळे संथ गतीने सुरु असलेल्या भेल कंपनीचे काम त्वरीत पूर्ण करावे व परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करावी, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात तुळशीराम गेडाम, अशोक नेमपाले, केशव जांभुळकर, सोपान काळे, प्रशांत लांबकाने, मदन द्रुगकर, दुलीचंद कुथे, दुलीचंद राऊत, बाळकृष्ण काळे, नामदेव लांबकाने आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
भेल कंपनीचे काम संथगतीने
By admin | Updated: December 13, 2014 22:34 IST