पोलिसात तक्रार : शेफ महिला बचतगटातून केली फसवणूकभंडारा : महिलांच्या आत्मोन्नतीसाठी मोरेश्वर मेश्राम यांनी शेफ महिला बचतगटाची निर्मिती केली. या माध्यमातून त्यांनी महिलांना प्रलोभन देवून लाखो रुपयांनी फसविले. याप्रकरणी संतप्त शेकडो महिलांनी आज भंडारा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करुन तक्रार दाखल केली. अभियंता असलेल्या मोरेश्वर मेश्राम यांनी महिला व गरिब कुटुंबातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी शेफ महिला बचत गटाची स्थापना केली. यातून त्यांनी बकरी पालन-पोषण, कुकूटपालन व अन्य प्रकारच्या लघू उद्योग सुरु करून त्यातून आत्मनिर्भर व्हावे यासाठी त्यांना अर्थसहाय्यही केले. नागरिकांचा विश्वास संपादन केल्यानंतर महिलांसह पुरुषांनीही त्यांच्या बचतगटात मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक केली. यातून आर्थिक बाजू भक्कम होईल हीच त्यांनी आशा व्यक्त केली. सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर महिलांना पैसेही देण्यात आले. मात्र त्यानंतर मेश्राम यांच्याकडून महिलांची आर्थिक कुंचबणा करण्यात आली.याबाबत फसगत झालेल्या महिला व अन्य ग्राहकांनी पोलिसात धाव घेतली. मात्र पोलिसांनीही त्यांना पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केले नाही. शेफ महिला बचतगटाच्या माध्यमातून जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातीलही नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली. आज शनिवारला फसवणूक झालेल्या शेकडो महिला भंडारा पोलिस ठाण्यावर चालून आल्या. त्यांनी फसगत करणाऱ्या अभियंता मेश्राम यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यासंबंधात या शेकडो महिला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचल्या यावेळी त्यांनी तेथील उपस्थित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शेकडो महिला एकाचवेळी ठाण्यावर चालून आल्याने पोलिसांचीही भंबेरी उडाली होती. याप्रकरणात काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
महिलांचा ठाण्यावर हल्लाबोल
By admin | Updated: August 28, 2016 00:10 IST