मोहाडी : माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी महिलेचा छळ करणाऱ्या पती ,सासु, सासरे व नणंद या चार जणांविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राची मैयुर खौल रा. रोहा हिचा विवाह मैयुर पंडितराव खौल (२८) राहाटगाव जि. अमरावती यांच्या सोबत ९ मार्च २०२० रोजी भंडारा जिल्ह्यातील रोहा येथे झाला. प्राची हिला सासरच्या मंडळीनी एक महीना चांगले नांदवले. नंतर पती, सासू, नणंद, सासरे यांनी व्यवसायासाठी दोन लाख रुपयांची मागणीचा तगादा लावला. तसेच शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. फिर्यादी प्राची हिच्या तक्रारीवरून, लग्नात ठरलेला हुंडा दिला तसेच सर्व काही रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. पुन्हा त्यांनी मागितलेले दोन लाख देऊ शकत नाही, हे सांगितल्यावर सासु-सासरे यांनी मला व माझे पतीसोबत माहेरी पाठवून दोन लाख रुपये घेऊनच यावे म्हणून सांगितले. माझ्या वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने दोन लाख रुपये देणे जमले नाही. त्यामुळे माझे पती मयूर यांनी मला मारझोड करून तुझ्या बापाची दोन लाख रुपये देण्याची औकात नाही, असे सांगितले.
तसेच तु राहाटगावला ये तुला ठार मारतो, अशी धमकी देऊन निघून गेला. काही दिवसानंतर माझे आई वडिलांनी मला सासरी नेऊन दिले. त्यावेळी सासरच्या मंडळीनी तू पैसे घेऊन आलीस का खाली तोंड दाखवत आलीस म्हणून माझ्या आई-वडिलांसोबत शिवीगाळ करून आम्हाला परत पाठविले. माझे लग्न होऊन एक महिन्यातच पतीने मला मारहाण करून शिवीगाळ केली. सासू रेखा खौल, सासरा पंडितराव खौल व नणंद पुजा अमर घटारे हे ही शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत आहेत हुंडा प्रवृत्ती तिच्या कुटुंबावर कडक कारवाई करून मला न्याय द्यावे अशी तक्रार प्राची खौड हिने पोलीस स्टेशन मोहाडी येथे केली आहे.