आंधळगांव येथील प्रकरण : अकराव्या वर्गाचे प्रवेश शुल्क वाढविले होतेआंधळगाव : आंधळगाव येथील जि.प. विद्यालयातील शाळा समितीने अकराव्या वर्गातील प्रवेश घेण्यासाठी फी वाढ केली होती. या अवाजवी फी वाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन दिनांक १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता विद्यालयासमोर करण्यात आले. फी वाढ रद्द करण्याचा निर्णय प्राचार्य बोळणे यांनी घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील दहावीतून उत्तीर्ण झालेले व बाहेरगावातील बरेचसे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अकरावी विज्ञान व कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी शाळा समितीने मागील महिन्यात जि.प. सदस्य राणीताई ढेंगे व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश फी मोठी वाढ केली होती. वाढविलेली फी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ४ जुलै प्राचार्य बोळणे यांना निवेदन देण्यात आले होते. शासनाच्या परिपत्रकाच्या विरुद्ध शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश फी वाढविली होती. या वाढीव फी च्या विरोधात जि.प. विद्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा उपप्रमुख राजेश बुराडे, तालुका प्रमुख हंसराज आगासे, नरेश उचिबगले तुमसर, पवन चव्हाण, प्रा.देवेंद्र रंभाड, शिवशंकर द्रुगकर, राजू मते इत्यादी उपस्थित होते. वक्त्यांची भाषणे होवून प्राचार्य बोळणे यांना निर्णय मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली. रस्त्यावरच ठिय्या मांडून शिवसैनिकांनी प्राचार्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. प्राचार्यांनी स्वत: येवून चर्चेसाठी बोलाविले. त्यांच्या कक्षात नायब तहसीलदार थोटे, उपशिक्षणाधिकारी पडोळे, गटशिक्षणाधिकारी गाढवे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेश बुराडे, शिवशंकर द्रुगकर, देवेंद्र रंभाड, हंसराज आगाशे, नरेश उचिबगले, राजू मते, गोवर्धन मारवाडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांनी पालकांची दिशाभूल केली. अतिरिक्त वाढीव तुकडीकरिता शासन कोणतेही वेतन देत नाही, त्यामुळे आम्हाला प्रवेश फी जास्त घ्यावी लागते. चर्चेमध्ये उपशिक्षणाधिकारी पडोळे, गटशिक्षणाधिकारी गाढवे यांनी वाढीव तुकडीकरिता लागणाऱ्या शिक्षकांचे वेतन जि.प. शिक्षण विभागातून होत असते. याकरिता प्रवेश फी वाढ करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मागील वर्षाचे अंदाजे ४० हजार रुपये शिल्लक असल्याने या मधूनच आपल्या शाळेच्या गरजा पूर्ण होत आहे. त्याकरिता प्रवेश फी मध्ये वाढ न करता पाचशे रुपये ठेवण्यात यावे असे ठरविण्यात आले. त्यामुळे वाढविलेली फी रद्द करण्यात आली.आंदोलनाच्या यशस्वितेसाठी धनराज पाटील, भगवान विठोले, केशव कावळे, कैलाश झंझाड, कैलाश शेंडे, नरेश चापरे, दशरथ बोरकर व गावकऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन सहकार्य केले. (वार्ताहर)
शिवसेनेच्या आंदोलनामुळे फी वाढ रद्द
By admin | Updated: July 17, 2016 00:24 IST