लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : उन्हाळा सुरू होताच तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. त्याचा मोठा फटका जंगलातील वन्यप्राण्यांना बसत आहे. लाखनी वनपरीक्षेत्रांतर्गत लाखनी, जांभळी व उमरझरी या तीन सहवनक्षेत्रांचा समावेश असून, या भागातील जंगलात नैसर्गिक जलस्रोत वगळता मोठ्या प्रमाणावर कृत्रिम पाणवठे उपलब्ध नाहीत. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत आहेत.
वन्यप्राण्यांसाठी जंगलातील नदी, नाले, तळे आणि नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्यात कोरडे पडू लागतात. त्यामुळे या भागातील वाघ, बिबटे, हरणे, ससे, लांडगे, कोल्हे तसेच विविध प्रकारचे पशु-पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहेत. वन विभागाच्या वतीने काही ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले असले तरी ते दुरवस्थेत असल्याने पाणी गळती होत आहे, परिणामी पाणवठे निष्क्रिय ठरत आहेत. वन्यप्राण्यांचे जंगलामध्ये नैसर्गिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करावे.
वनविभागाकडे मागण्यानादुरुस्त पाणवठ्यांची त्वरित दुरुस्ती करावी. नवीन पाणवठे उभारून वन्यप्राण्यांना पुरेसा जलसाठा उपलब्ध करून द्यावा. वॉटर टँकरद्वारे उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा करावा. वन्यप्राण्यांना पाणी सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी अधिक पाणवठे निर्माण करावेत. महामार्ग ओलांडणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात.
नादुरुस्त पाणवठ्यांमुळे समस्या गंभीरवन्यप्राण्यांसाठी वनविभागाने काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण केले असले, तरी त्यांच्या योग्य देखभालीअभावी हे पाणवठे निकामी होत चालले आहेत. पाण्याची गळती, साफसफाईचा अभाव आणि जलपुरवठ्याचे अपयश यामुळे अनेक पाणवठे कोरडे पडले आहेत. परिणामी, वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे वळत आहेत.
लाखनी व जांभळी सहवन क्षेत्रातील वन्यप्राणी पाण्यासाठी महामार्ग ओलांडताना अनेकदा अपघातग्रस्त होतात. उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र बनते, पाण्याच्या शोधातील प्राण्यांना रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत जीव गमवावा लागतो.