तुमसर : चिखला शेत शिवारात जंगलाशेजारील शेतात वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे ऊस शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. ऊस पिकांच्या नासधुसीमुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणी करावी लागत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी वनविभागाला तक्रार केल्यावरही एका महिन्यानंतरही पंचनामा केला नाही. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची बतावणी विभाग करीत आहे.चिखला येथील शेतकरी दशरथ अनंतराम गेडाम व नत्थू केवल बोरकर यांनी अनुक्रमे दीड व दोन एकर शेतात ऊस लागवड केली आहे. एक महिन्यापूर्वी वन्यप्राण्यांनी संपूर्ण ऊस पीक उध्वस्त केले. याची रितसर तक्रार नाकाडोंगरी वनविभागाला करण्यात आली. ऊस भूईसपाट झाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी ऊस तोडणी केली. एक महिन्यापासून पंचनामा करण्याकरिता वनविभागाचे कर्मचारी आले नाही. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर येथे आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. सातपुडा पर्वतरांगा असलेल्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात चिखला हे गाव येते. जंगलात पानवठे नाहीत. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे येतात.कर्तव्यात कसूर व दप्तरदिरंगाई येथे केली जाते असा आरोप चिखल्याचे उपसरपंच दिलीप सोनवाने यांनी केला आहे. येत्या दोन दिवसात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा सोनवाने यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वन्यप्राण्यांनी केले ऊस पीक उद्ध्वस्त
By admin | Updated: February 18, 2015 00:23 IST