आढावा सभा : नाना पटोले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना भंडारा : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राममध्ये वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनीसुद्धा गर्रा बघेडा या गावात वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश भारत संचार निगम च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे वायफाय सुविधा मिळणारे गर्रा हे महाराष्ट्रतील दुसरे गाव ठरणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात खासदार नाना पटोले यांनी सांसद आदर्श ग्राम अंतर्गत गर्रा या गावात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र निंबाळकर, पोलिस अधीक्षक दिलीप झळके उपस्थित होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, गावात मूलभूत सोयीसुविधा तयार करण्यासोबतच गावातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे. दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, शेतीआधारित कुटीर उद्योग , फलोत्पादन आदी उद्योग करण्यासाठी गावक-यांना प्रोत्साहित करावे. गोबरवाही पाणीपुरवठा योजना, आंगणवाड़ी बांधकाम, वर्गखोल्यांचे बांधकाम, गावात शुद्ध पाणी देण्यासाठी व्यवस्था, शौचालय बांधकाम, गावाची स्वच्छता, गावातील लोकांमध्ये चांगल्या सवयी रुजविण्यासाठी प्रयत्न आदी विषयांवर त्यांनी चर्चा केली. गा गावातील सुशिक्षित बेरोजगारांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी केंद्र स्थापन करुन ग्रंथालयाची निर्मिती करावी. गावात प्रशस्त ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम करावे. त्यामध्ये प्रशिक्षण हॉल, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र आदी सुविधा कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गावात १५ आॅगस्टपर्यंत सर्व काम सुरु करावे. १५ आॅगस्टनंतर गावात प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, तुमसर गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे व विभागप्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)
गर्रा बघेडात मिळणार वायफाय सुविधा
By admin | Updated: July 15, 2015 00:35 IST