साकोली : श्ोती व भुखंडाची नोंदणी करण्याकरिता साकोली तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कैलाश गाढे आणि अर्जनवीस मुरलीधर कऱ्हाडे या दोघांना १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. चौकशीदरम्यान दुय्यम निबंधक गाढे यांच्या घरझडतीमध्ये ५२ हजार रुपये रोख मिळाले.दि. १६ रोजी तक्रारकर्त्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. यात तक्रारकर्त्याची साकोली तालुक्यातील सुकळी येथील विकलेली श्ोतजमिन व त्याची पुतणी कुसुम कोरे रा. बोंडगावदेवी (जि.गोंदिया) हिने खरेदी केलेल्या भुखंडाची नोंदणी करण्याकरिता साकोली तहसिल कार्यालयातील दुय्यम निबंधक विभागात कागदपत्र दाखल करण्यात आले. यावेळी दुय्यम निबंधक कैलाश गाढे व अर्जनविस मुरलीधर कऱ्हाडे यांनी रजिस्ट्रीकरिता प्रत्येकी १५ हजार रुपये लागतील, असे सांगुन ३० हजार रूपयांची मागणी केली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, बुधवारला साकोली तहसिल कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी गाढे यांनी प्रत्येकी रजिस्ट्रीकरीता १० हजार रुपयांची मागणी केली व तडजोडीनंतर अर्जनवीस कऱ्हाडे यांचेकडे लाच रक्कम देण्याकरिता सांगुन गाढे यांनी अर्जनवीस कऱ्हाडे यांच्यामार्फतीने दोन्ही रजिस्ट्रीचे १५ हजार रुपयांची लाच घेताना दुय्यम निबंधक कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले.याप्रकरणी दोंघाविरूद्ध साकोली पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायदा सन १९८८ अन्वये कलम ७, ८, १३ (१)(ड) सह कलम १३ (२) गुन्हे दाखल करण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक गाढे हे साकोली येथे भाड्याच्या घरी राहत होते. त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा ५२ हजार रुपये रोख मिळाले. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव पोलिस अधीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलिस निरीक्षक किशोर पर्वत, जीवन भातकुले, अशोक लुलेकर, सचिन हलमारे, पराग राऊत, गौतम राऊत, अश्विन कुमार गोस्वामी, लोकेश वासनिक, महिला शिपाई रसिका कंगाले यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
लाच घेताना दुय्यम निबंधक जाळ्यात
By admin | Updated: December 18, 2014 00:28 IST