विलास श्रुंगारपवार : व्याजाचा नाहक भुर्दंड बसणारभंडारा : उन्हाळी धानपिकाची खरेदी केल्यानंतर चार दिवसात चुकारे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. हे सरकार केवळ पोकळ आश्वासन देणारे सरकार असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विलासराव श्रुंगारपवार यांनी केला आहे.मागीलवर्षी खरीपाच्या हंगामातील धानपीक शेतकऱ्यांच्या हातात आले. त्यावेळी आधारभूत धान खरेदी केंद्र विलंबाने सुरू करण्यात आले. त्यामुळे कर्जात असलेल्या शेतकऱ्यांना धानपीक कमी दरात व्यापाऱ्यांना विकावे लागले. आधारभूत केंद्र सुरू झाले तोपर्यंत शेतकऱ्यांचे धानपीक विकून झाले होते. त्यामुळे त्यांना बोनस मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी नागविला गेला. या कठिण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. पीक आल्यानंतर ते विकण्यासाठी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. खरेदीच्या चार दिवसातच चुकारे देऊ, असे सरकारने सांगितले होते. परंतु अद्याप चुकारे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन धान लागवड केली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत ३० जूनपर्यंत पीक कर्जाचे पैसे भरावे लागतात तर जिल्हा बँकेत ३१ मार्च ही कर्ज भरण्याची शेवटची तारीख असते. शेतकऱ्यांना वेळेत चुकारे न दिल्यामुळे ते पैसे कसे भरतील? त्यांच्यावर व्याजाचा नाहक भुर्दंड पडेल त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही श्रुंगारपवार यांनी उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)
उन्हाळी धानाचे चुकारे केव्हा मिळणार?
By admin | Updated: July 4, 2016 00:24 IST