उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:36 AM2021-05-10T04:36:18+5:302021-05-10T04:36:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात हवा तेवढा वाव नाही. त्यातही भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार ...

The wheel of industry slowed; Companies can't get jobs for people and workers! | उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना!

उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात हवा तेवढा वाव नाही. त्यातही भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगारही गेले आहेत. उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना काम मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदीचा परिणाम स्वरूपात जाणवण्याची धास्ती उद्योजक व कामगारांमध्ये व्याप्त आहे.

कोरोना महामारीने पुन्हा एकदा उद्योगजगतावर मंदीचे सावट आणले आहे. यामुळे कामगारांना आपली नोकरी जाण्याची तर उद्योजकांना कामगार गावी परत जाण्याची भीती सतावू लागली आहे. जिल्ह्यात हातावर मोजण्याइतपतच उद्योग आहेत. त्यातही अन्य गावांतून किंवा परप्रांतातून आलेले मजूर परत जातील याबाबत चिंता व्यक्त होत आहे. कामगारांना नोकरीची चातकासारखी प्रतीक्षा करावी लागत असते. लॉकडाऊन उघडल्यानंतर कामगार आपापल्या उद्योगधंद्यात कामावर परत आले होते. राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली, ती आजही कायम आहे. लॉकडाऊननंतर नोकरी मिळायला त्रास झाला. आता पुन्हा संचारबंदीत कामगारांनी चटणी-भाकर खाऊन दिवस काढले. आता स्थिती सुधारणार की नाही, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.

कच्चा माल मिळण्यात अडचणी

कोरोनामुळे संचारबंदी लावण्याची वेळ आली. अनेक उत्पादक कंपन्या बंद करण्यात आल्या. काही ठिकाणी कमी मॅनपाॅवरमध्ये कामे काढली जात आहेत. भंडारा जिल्ह्यात औद्योगिक वसाहती आणि कंपन्याही कमी आहेत. त्यातही कच्च्या मालाची वाहतूक होणे म्हणजे जिकिरीची बाब आहे. तेल कंपन्यांना कच्चा माल मिळणे दुरापास्त झाला आहे. यंत्रांचे लहान-मोठे सुटे भाग नादुरुस्त झाल्यास ते मागविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. गतवर्षी जनता कर्फ्यूनंतर कारखान्यांतील कामगार व मजूर पायीच गावाकडे निघाले होते. त्यापैकी काहींना आजही काम मिळाले नाही.

गतवर्षीच्या आठवणी कायम आहेत. रोजगार गेल्यानंतर काय परिस्थिती असते, याची कल्पना न केलेली बरी; पण आता महिनाभरापासून हाताला काम नाही तर दामही मिळणार नाही. आता इथे राहून काय करणार, असा सवाल आहे.

-प्रेमदास रंगारी, कामगार, भंडारा

हाताला काम मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही. गरिबीत अनेक दिवस काढले. गतवर्षी सहा महिने हाताला काम मिळाले नाही. अनेक अडचणींना सामना करावा लागला. संचारबंदीमुळे हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

-मुकेश साकुरे, कामगार, भंडारा

कोरोना काळात अनेक लहान-मोठे उद्योग बंद झाले. उद्योगजगताची गाडी हळूहळू रुळावर आली होती. संचारबंदीत साहित्याचा पुरवठा वेळेवर होत नाही.

येत्या काही दिवसांत स्थिती सामान्य झाली नाही तर टेन्शनमध्ये वाढ होणार, यात शंका नाही.

- डिम्पल मल्होत्रा, उद्योजक व डिस्ट्रिब्युटर कन्झ्युमर प्रॉडक्ट

राज्य शासनाने संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे. कामगार घरी परततात. कंपन्यांना माणसं मिळत नाहीत. कच्चा माल वेळेवर मिळत नाही. स्थिती अशी उद्‌भवते की कामगारांना काम मिळत नाही. स्थिती सामान्य व्हायलाच हवी, यात कामगार व उद्योजक दोघांचे हित आहे.

-नितीन दुरगकर, उद्योजक, भंडारा

अनेक ठिकाणी कामगार कमी-जास्त प्रमाणात आपापल्या उद्योग क्षेत्रात परतले होते. गाडी पुन्हा रुळावर आली होती. उद्याेगांचे चाक मंदावले आहे. कामगारांना काम मिळणे आवश्यक आहे. संचारबंदीमुळे कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. आर्थिक फटकाही बसतो.

-जयंत गज्जर, उद्योजक, भंडारा

Web Title: The wheel of industry slowed; Companies can't get jobs for people and workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.