चुल्हाड (सिहोरा) : लोकसभा निवडणूक संपताच बपेरा आंतर राज्यीय सिमेवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाची चौकी हटविण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी उभारलेली राहुटी उभी असल्याने या चौकीचा उपयोग काय, असा प्रश्न आहे.नक्षलग्रस्त बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्याच्या हाकेच्या अंतरावर बपेरा आंतरराज्यीय सिमा आहे. या सिमेवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची ओरड जुनीच आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षतेची गरज आहे. या परिसरात सातत्याने चोरीच्या घटना होत आहेत. गेल्या वर्षात सावकार हत्या प्रकरणाने नागरिक दहशतीत वावरत आहे.आजवरच्या चोरीच्या घटनात सहभाग असणारे सराईत चोर मध्यप्रेदशात पळून गेले आहे. हे चोर अद्याप पोलिसांना गवसले नाही. तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी, अनेक प्रकरण फाईल बंद झाल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांच्या तावडीत चोर सापडत नसल्याने ते आता दिवसाढवळ्या महिलांचे दागिने लुटत आहेत. चारचाकी, दुचाकी या साधनांचा उपयोग हे चोरटे करीत आहे. परंतु या वाहनांची नोंद कोणत्याही नाका आणि चौकीवर होत नाही.दरम्यान, बपेरा आंतरराज्यीय सिमेवर पोलीस चौकीचा प्रस्ताव मंजुर झाल्याचे सांगण्यात येत आहेत. परंतु जागे अभावी हा प्रस्ताव अडला असल्याची दुसरी बोंब पोलीस विभाग ठोकत आहे. संबंधित प्रस्ताव महसूल विभागात असल्याची माहिती पोलीस सुत्रानी दिली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालय आणि महसूल विभागाचे मुख्य कार्यालय भंडार्यातच आमने सामने आहेत.प्रस्तावावर शिक्कामोर्तब तथा अंतिम मंजुरी देताना अनेक वर्षाचा कालावधी लागत आहे. ही बाब सामान्य जनतेला खटकणारी आहे. सिहोरा येथील सावकार हत्या प्रकरणात तत्कालिन जिल्हा पोलीस अधिक्षक आरती सिंग यांनी जागेची पाहणी केली होती.पंचायत समिती सभापती कलाम शेख यांनी इमारत बांधकाम करून देण्याची ग्वाही दिली होती. परंतु नंतर ही प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. या जागेचा प्रश्न ना निकाली काढण्यात आला, ना इमारत बांधकाम झाले. पुन्हा पोलीस चौकीचा प्रस्ताव रेंगाळला असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची पोलीस चौकी तैनात करण्यात येत आहे. या कालावधीत कोणत्याही अप्रीय घटना होत नाही. साधी सायकल चोरीला जात नाही. परंतु चौकी हटविताच चोरीच्या घटना वाढत आहेत. यानंतर राज्यीय सिमेवर पोलीस चौकीची राहुटी उभी आहे. देवसर्रा गावाच्या हद्दीत ही राहुटी पोलीस तैनात असल्याची साक्ष देत आहे. परंतु प्रत्यक्षात पोलीस तैनात नाही. येत्या विधानसभा निवडणूक काळात याच राहुटीचा उपयोग पोलीस बंदोबस्तासाठी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.यामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षतेचे काय, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. बपेरा आंतर राज्यीय सिमेवर सिसीटिव्ही कॅमेरा अंतर्गत पोलीस चौकी मंजुर करण्याची ओरड पुन्हा सुरू झाली आहे.सिहोरा गावात ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी कॅमेरे लावण्याचा शब्द पाडला आहे. आता पोलीस विभागाने ही पोलीस चौकी मंजुरीचा शब्द पाळला पाहिजे, अशी रास्त अपेक्षा नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
त्या चौकीचा उपयोग काय?
By admin | Updated: May 9, 2014 03:04 IST