पाणी पुरवठा योजना ठप्प : चौरास भागातील विहिरीने गाठला तळलाखांदूर : एकेकाळी २० फुटावर चौरास भागात पाणी लागत होते. आता तब्बल ४०० फूट खोलीवरही पाणी नाही. तालुक्यात पाण्यासाठी ओरड सुरु आहे. बोरींग बंद पडल्या, पाणीपुरवठा योजना धाकधुकीवर सुरू असुन मे महिन्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात पाच टक्के जलसाठा शिल्लक आहे. चुलबंद नदीपात्र कोरडे पडले आहे. नदीमधील वाहते पाणी थांबले तर पाण्याची पातळी खोलवर जायला वेळ लागणार नाही. दरवर्षी उन्हाळी धान पीक राहत असल्याने इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे पाणी टंचाई भासत नव्हती. मात्र यंदा चित्र बदलले आहे. पीक नसल्याने धरणाचे पाणी सोडले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली.चौरास भागात कृषी पंपाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नदी पात्र आटल्याने पाण्याची पातळी खोलवर गेली ४०० फूट खोलीवरही पाण्याचा पत्ता नसल्यामुळे कृषीपंप बंद पडले. उन्हाळी धानपीक करपु लागले. ग्रामीण पाणीपुरवठा योजना धाकधुकीवर असून अनेक गावातील नळयोजना बंद पडल्या आहेत. हातपंप तर १५ दिवसापूर्वीच बंद पडल्या. दरवर्षी तालुक्यात शेतावर व नदीपात्रात टरबुजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र पाणी टंचाई लक्षात घेता टरबुज शेती थांबविण्यात आली.पाणी टंचाई लक्षात घेता शासकीय बांधकामे तसेच खाजगी बांधकामे अडचणीत आले आहे. खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशिवार यांनी इटियाडोह पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडले. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली. परंतु मे महिण्यापर्यंत उन्हाळा तीव्र होत असल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (तालुका प्रतिनिधी )
विहिरी आटल्या, हातपंप बंद
By admin | Updated: April 29, 2016 00:35 IST