आठ ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम : शेतकऱ्यांनी घेतला कार्यक्रमाचा लाभभंडारा : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा, प्रकाय तथा मंडळ कृषी अधिकारी भंडारा तसेच प्रगती मागासवर्गीय महिला संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने क्लस्टर क्रमांक ४ भंडारा येथील ८ ग्रामपंचायतमध्ये पाणी व पिक पद्धती व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम डव्वा, टेकेपार, खमारी बु, कवलेवाडा, माटोरा, मंडणगाव, आमगाव, करचखेडा या गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यता आले. या कार्यक्रमात ४५० ते ५०० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. नाव नोंदणीपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पाणलोट विकास यंत्रणा व त्याची संकल्पना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात प्रोजेक्टरने पीपीटीद्वारे पाणी व पिक पद्धती व्यवस्थापनाचे महत्व व सिंचन पद्धती, पाण्याचे अंदाजपत्रक, कोरडवाहू पिक व्यवस्थापन पद्धती, कृषी पुरक व्यवसाय, विविध पिकांना पाणी देण्याच्या अवस्था, गावाचे पाण्याचे अंदाजपत्रक, पिक नियोजन, पिक नियोजन मुख्य उद्देश, पिक नियोजन घटक, प्रकारानुसार घ्यावयाचे पीके, जमिनीचे उपयोगीतेनुसार वर्गीकरण अन्नघटक याविषयी उपस्थित प्रशिक्षणार्थींना किर्ती डांगे, भुषण टेंभुर्णे यांनी मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपाय, पीक नियोजन, आंतरपिके, फळबाग, सेंद्रीय खतांचे महत्व आदी बाबींची प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी पाणलोट समिती अध्यक्ष, सचिव, सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रकाय तथा मंडळ कृषी अधिकारी बावणकर, कृषी पर्यवेक्षक झंझाड यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
पाणी, पीक पद्धती व्यवस्थापन कार्यक्रम
By admin | Updated: April 11, 2015 00:32 IST