भंडारा : पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या गराडा बुज येथे मनरेगाच्या नाला सरळीकरण कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी भंडारा खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामपंचायत गराडा बुज मार्फत मनरेगा अंतर्गत नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे. महिला मजुराची प्रसूती कालावधी दरम्यान तिला कामावर हजर दाखविण्यात आले आहे. प्रसूतीच्या पूर्वी व नंतर तिची मस्टरवर हजेरी दाखवून निधी देण्यात आला आहे. तुळसा अजाबराव प्रत्येके यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. तरीही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची हजेरी लावून निधीचे वाटप करण्यात आले. अशीच बाब अन्य पाच जणांबाबत करण्यात आली आहे.मस्टर रोलवर गैरहजेरीच्या ठिकाणी खोडतोड करुन मजुर उपस्थित असल्याचे दर्शविण्यात आले आहे. परिणामी या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षरित्या कामावर असलेल्या मजुरांचे नुकसान झाले आहे, या आशयाची पूर्ण माहिती सन २००५ च्या माहितीच्या अधिकार अन्वये घेण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परसराम देशमुख व अन्य ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. संबंधित रोजगारसेवक व ग्रामसेवकाच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवेदनाची प्रतिलिपी उपजिल्हाधिकारी मनरेगा (रोहयो), तहसीलदार भंडारा व खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
मनरेगाच्या कामात गैरव्यवहार
By admin | Updated: June 11, 2014 23:11 IST