दिवाळी अंधारात : शिक्षक कर्मचाऱ्यांचा बेमुदत उपोषणाचा इशारातुमसर : एकात्मिक बालविकास प्रकल्प भंडारा अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे माहे जून २०१५ पासून ते आजतागायत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे वेतन न झाल्यामुळे २१२ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. इतकेच काय तर दिवाळीही अंधारातच जाणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या प्रकाराला वैतागून बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भंडारा अंतर्गत भंडारा जिल्ह्यात खांबा जांभळी, आदर्श आमगाव, आंबागड, पौनारखारी, कोका जंगल, माडगी, चांदपूर, येरली या आठ अनुदानित आदिवासी आश्रम शाळा कार्यरत आहेत. परंतु जून २०१५ पासून आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा प्रकल्प अधिकारी, लेखा अधिकारी, रोखपाल व लिपिकाच् या बेजबाबदार वागणुकीमुळे पाच महिन्यांचे वेतन थकीत झाले आहेत. परिणामी शिक्षक कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक नुकसान सोसावा लागत आहे. इतरांकडून व्याजाने घेतलेले पैसेवाले शिक्षक कर्मचाऱ्यांच्या घरी चकरा मारताना दिसतात. गृहपयोगी व गृहकर्जाच्या किस्त, एल.आय.सी. किस्त थकीत झाल्याने त्यांच्यावर व्याज चढत आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन द्यावे असे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र त्या परिपत्रकांना प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी मुठमाती देत आहेत. हेतुपुरस्सर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न देणे, पाच पाच महिन्याचे वेतन थकीत ठेवून कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास नेहमीच सोसावा लागत असल्याने दि. २ नोव्हेंबर पर्यंत थकीत पाच महिन्याचे वेतन न दिल्यास ३ नोव्हेंबर पासून आदिवासी आश्रम शाळाशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसणार असल्याचा इशारा संघटनेचे भोजराम पुंडे, विलास सपाटे महिला आघाडीचे व्ही.कुंभलकर, एम.चव्हाण, पी.डी. भोयर, ए.बी. सार्वे यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी हाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. उपोषण काळात निवासी विद्यार्थ्यांची समस्या व अडचणी संबंधित अधिकारी जबाबदार राहणार असेही निवेदनात नमूद केले आहे. (शहर प्रतिनिधी)
आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
By admin | Updated: October 30, 2015 00:51 IST