मोहन भोयर - तुमसर
तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॉटफॉर्म क्रमांक १ वर मालवाहू रेल्वेचा तासनतास थांबा असतो. हे मालवाहू रेल्वे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभ्या केल्या जातात. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सेवेसाठी की प्रवाशांना त्रास देण्यासाठी? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मुंबई-हावडा रेल्वे महामार्गावर तुमसर रोड जंक्शन हे महत्वपूर्ण रेल्वेस्थानक आहे. पॅसेंजर व जलद रेल्वे गाड्यांचा येथे थांबा आहे. हजारो प्रवासी येथून दररोज ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाने या रेल्वे स्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा दिला आहे. रेल्वे प्रशासनाच्या सर्वच विभागाचे येथे कार्यालये आहेत, परंतु नियोजनाअभावी मागील अनेक महिन्यापासून प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. येथे स्वतंत्र प्लॅटफार्म आहे. डाऊन रेल्वे मार्गाच्या प्रवाशी रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येतात. मालवाहू रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर तासनतास उभ्या असतात. यामुळे वृद्ध, महिला, पुरूष, अपंगांना जीव धोक्यात घालून रेल्वे स्थानकाबाहेर जावे लागते. येथील फूट ओव्हरब्रीज हा पायर्यांचा असल्यामुळे अपंग व वृृद्धांना चढता येत नाही. डाऊन रेल्वे मार्गावर प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभ्या केल्या तर त्याचा प्रवाशांना लाभ होईल. प्रसाधनगृह नाही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन या संयुक्त प्लॅटफॉर्मवर डाऊन मार्गावर पूर्व दिशेला प्रसाधनगृह नाही. त्यामुळे अर्धा कि़मी. अंतरावर पूर्व दिशेला अथवा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशांना जावे लागते. ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन असमर्थ ठरले आहे.