लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गेल्या २४ तासापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून भंडारा येथील कारधा पुलावर आज सकाळी ११ वाजता २४५.५६ मीटरची नोंद घेण्यात आली आहे, धोक्याचा पातळी इशारा २४५.५० आहे.गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ गेट रात्री दीड वाजता सुरू करण्यात आले असून १०,००० क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात काही घरांची अंशत: पडझड झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
मार्ग बंद पडलेभंडारा ते कारधा मार्गावरील वैनगंगेच्या लहान पुलावरून पाणी वाहायला लागले असल्याने हा मार्ग कालपासून बंद करण्यात आला आहे. भंडारा तालुक्यातील खमारी ते माटोरा हा मार्ग बंद पडला आहे. तसेच तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी, चुल्हाड ते सुकळी नकुल, कर्कापूर ते रेंगेपार, कर्कापूर ते पांजरा, तामसवाडी ते सीतेपार, सिलेगाव ते वाहनी, सुकळी ते रोहा, तामसवाडी ते येरली हे आठ मार्ग बंद झाले आहेत.
मोहाडी तालुक्यातील उसर्रा ते टाकला, डोंगरगाव ते कान्हळगाव ( सी.) आणि ताडगाव ते सिहरी हे तीन मार्ग बंद पडले आहेत. असे असले तरी पर्यायी मार्ग सुरू आहेत.