प्रशासन अनभिज्ञ : महाड दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यतातुमसर : मध्यप्रदेशात संततधार पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी वाहत आहे. तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथे नदीपात्र गावाजवळ आहे. येथे नदी काठाचे भूस्खलन झाले तर १२ घरे वाहून जाण्याची शक्यता आहे. आठ वर्षापासून पुनर्वसनाचा प्रश्न येथे अधांतरी आहे. महाडच्या दुर्घटनेनंतर प्रशासन येथे गाफील दिसत आहे.वैनगंगा नदी पात्रातून १० ते १२ वर्षापासून बेसुमार रेती उपसा सुरु आहे. बपेरा ते रोहा बेटाळापर्यंत नदी घाटावरुन रेतीचा उपसा सुरू असून तिरोडा तालुक्यातही तोच प्रकार सुरु आहे. तांत्रिकदृष्ट्या नदीचे पात्र दिवसेंदिवस गावाच्या दिशेने सरकत आहे. शेकडो हेक्टर शेती नदी पात्रात गिळंकृत झाली. नदी पात्रात रेती नसल्याने नदीचा प्रवाह हा सरळ न जाता खोलगट भागाकडे जातो. रेंगेपार हे गाव उंचीवर आहे. काळी सुपिक जमीन गावाजवळ आहे. मागील आठ वर्षापासून वैनगंगा नदी या गावाच्या दिशेने झपाट्याने वाढली आहे. नदी काठावर १२ घरे आहेत. ही सर्व कुटूंबे दारिद्रय रेषेखालील यादीत आहेत. यात विजयकला भुरे, अशोक उके, आनंदराव सोनवाने, प्रमानंद ठाकरे, अंबर शेंडे, रामभाऊ नागपुरे, ब्रिजलाल मोरांडे, गुलाब कावळे, कला शेंडे, हंसराज माहुले, कंठीराम नागपुरे यांच्या घराचा समावेश आहे.या कुटूंबांना राज्य शासनाकडून भूखंड मिळाले, पंरतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांनी घरे बांधली नाही. शासनाने घरे बांधून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार नाना पटोले यांनी पुनर्वसनाकरिता आंदोलन केले होते. राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे असून आता तरी न्याय मिळेल काय? अशी आर्त हाक या कुटूंबानी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)आठ वर्षापासून शासन व लोकप्रतिनिधीकडे मागणी केली जात आहे. परंतु अद्याप यश आले नाही. दुर्घटनेनंतर शासनाला जाग येईल का? आंदोलनाशिवाय आता पर्याय उरलेला नाही.- हिरालाल नागपुरेगटनेते पं.स. तुमसर
वैनगंगा फुगली - रेंगेपारला धोका
By admin | Updated: August 9, 2016 00:32 IST