तीन महिने भीषण जलसंकटाची चाहूल : चारगाव शिवारात नदीचा प्रवाह बंद होण्याच्या मार्गावरतुमसर : तुमसर तालुक्यातून वाहणारी वैनगंगा उन्हाळ्यापूर्वीच कोरडी पडली आहे. मुख्य जलस्त्रोत कोरडा पडल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. चारगाव (दे) शिवारात नदीची धार शेवटची घटका मोजत आहे. येत्या दहा दिवसात नदी प्रवाह बंद होण्याचे संकेत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून धापेवाडा वाहणी बॅरेजमधून वक्रद्वार उघडण्याची गरज आहे.मध्यप्रदेशातून उगम पावणारी वैनगंगा नदी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे. बारमाही वाहणारी ही नदी असून मागील काही वर्षापासून वैनगंगा नदी उन्हाळ्यापूर्वीच कोरडी पडत आहे. बावनथडी नदीवर सीतेकसा येथे धरण बांधण्यात आला तर वैनगंगा नदीवर वाहणी मांडवी येथे बॅरेज तयार करण्यात आले. धापेवाडा सिंचन योजना तथा अदानी पॉवरला येथून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी अडविल्याने वाहनीनंतर वैनगंगेचे पात्र कोरडे पडले आहे.वैनगंगा नदी जीवनदायीनी आहे. अनेक गावांना नदीतून पाणी पुरवठा केला जातो. वैनगंगा कोरडी पडल्याने अनेक पाणी पुरवठा योजना ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारगाव शिवारात वैनगंगेचा प्रवाह शेवटची घटका मोजत आहे. येत्या दहा दिवसात चारगाव (दे.) येथे पाण्याचा प्रवाह बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अनेक वर्षापासून तालुक्यातील नदीकाठावरील गावातील कोळी बांधव नदीपात्रात उन्हाळ्यात पालेभाज्या, टरबूज, काकड्यांची शेती करीत होते. परंतु पाण्याची पातळी राहत नसल्याने अनेकांनी ही शेती व्यवसाय बंद केला आहे. कोळी बांधवांवर सध्या मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.हिवाळा व उन्हाळ्यात नदी पात्रातून प्रचंड रेती उपसा केला जातो. यामुळे नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात पाणीसाठा असतो. यामुळे नदीचा प्रवाह सुरु राहण्यास अडचण निर्माण होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वैनगंगेसारखी मोठी नदी कोरडी पडत आहे. ही धोक्याची घंटा निश्चितच आहे. येथे शासनाने पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. जलसाठा यामुळे कमालीचा खाली जाण्याची शक्यता आहे. पाणी समस्येवर शासकीय अधिकाऱ्यांनी बैठका सुद्धा घेतल्या नाही हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)
उन्हाळ्यापूर्वीच वैनगंगा कोरडी
By admin | Updated: March 8, 2017 00:34 IST