गोसे (बु.) : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी (वन्यजीव) वनक्षेत्रातील जंगलात एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. हे तिन्ही बछडे या वाघिणीसोबत जंगलात मुक्तपणे विहार करीत आहेत. या तीन बछड्यांचा झालेला जन्म म्हणजे या जंगलात वाघांच्या संख्येत होत असलेली वाढ हे जरी चांगले लक्षणे असले तरी या बछड्यांना इतर वाघांपासून व अन्य वन्यप्राण्यांपासून वाचविणे फार महत्त्वाचे आहे.उमरेड कऱ्हांडला अभयारण्यामध्ये पवनी (वन्यजीव) वनपरिक्षेत्रातील १०.५२ चौरस कि.मी. जंगलाचा समावेश करण्यात आला आहे. हे अभयारण्य रानाई तलाव, वाही जलाशय, चिचखेडा, पाहुणगाव, खापरी, कोरंभी ते गोसीखुर्द धरणापर्यंत पसरले आहे. येथील जंगल घनदाट, विस्तीर्ण असल्यामुळे वाघ, बिबट, राष्ट्रीय पक्षी मोर, अन्य वन्यप्राण्यांचा नेहमी संचार असतो.या अभयारण्याच्या पवनी (वन्यजीव) वनपरिक्षेत्रात एका वाघीणीचे सुरुवातीपासून वास्तव्य आहे. न्यू नागझिरा अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचे अंतर कापून देखणा, हुशार, अत्यंत चपळ असलेला जय नामक वाघ या जंगलात मागच्या वर्षीपासून आला आहे. या जयचा या वाघिणीसोबत येथे संसार सुरु झाला.वाघ-वाघिणीच्या संसाररुपी वेलीवर फुले उमलून काही दिवसांपूर्वी तीन बछड्यांचा जन्म झाला आहे. दोन तीन दिवसापूर्वी ही वाघीण आपल्या तीन बछड्यांसह खापरी गावाजवळील तलावाजवळ फिरताना अनेकांनी पाहिले. दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी वाघिणीने नीलगाय मारली होती. या जंगलात तीन बछड्यांचा झालेला जन्म म्हणजे पट्टेदार वाघांच्या संख्येत होत असलेली वाढ हे चांगले लक्षण मानले जात आहे. पण या बछड्यांना दोन वर्षापर्यंत वाघ व अन्य वन्यप्राण्यांपासून वाचविणे गरजेचे आहे.यासंदर्भात अभयारण्याचे पवनी (वन्यजीव) वन वनक्षेत्राधिकारी गायकवाड यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तीन शावक वाघिणीसोबत फिरत असल्याची माहिती असल्याचे सांगितले. पण वन कर्मचाऱ्यांना फक्त वाघीणच फिरत असल्याचे दिसले. बछडे दिसले नाहीत. शावकांचा शोध घेण्याकरिता अनेक ठिकाणी कॅमेरे लावल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
वाघिणीने दिला तीन बछड्यांचा जन्म
By admin | Updated: August 16, 2014 23:17 IST