स्टेशनटोली येथील प्रकार : १० वर्षांपासून मतदानाला हजरतुमसर : गाव सोडून गेलेल्या मतदारांनी मागील दोन निवडणुकीत स्टेशनटोली देव्हाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केल्याचे उघड झाले आहे. स्टेशनटोली ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक तीन मधील हे मतदार सध्या परप्रांतात तथा राज्यातील इतर जिल्ह्यात वास्तव्याला आहेत, अशी धक्कादायक माहिती आहे.तुमसर तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून स्टेशनटोली देव्हाडी या ग्रामपंचायतीची नोंद आहे. सन १९९५ मध्ये देव्हाडी ग्रामपंचायतीपासून ही ग्रामपंचायत वेगळी करण्यात आली. सन १९९५ मध्ये येथे ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात आली होती. सात सदस्यीय ही ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचयतीमध्ये तीन वार्ड आहेत. वार्ड क्रमांक तीनमध्ये युनिव्हर्सल फेरो व युनिडेअरीडेंट कारखान्याच्या कामगारांची वसाहत आहे. या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांची नावे मतदार यादीत आहेत. युनिव्हर्सल फेरो कारखाना १० ते ११ वर्षापुर्वी कायम बंद झाला तर युनीडेअरीडेंट कंपनीच्या कामगारांनी नौकरी सोडून कामानिमित्त परप्रांतात गेले. काही कामगार छत्तीसगड (भिलाई), गुजरात तर काही कामगार चंद्रपूर, नागपूर येथे गेल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतीची निवडणुकी प्रसंगी मात्र हे कामगार मतदान कसरायला येथे येतात. तशी त्यांची सोय उमेदवार करतात, अशी माहिती आहे. स्टेशनटोली ग्रामपंचयतीची लोकसंख्या १९६६ आहे. येथे मतदारांची संख्या ९०३ इतकी आहे. वार्ड क्रमांक एक येथे मतदारांची संख्या २००, दोनमध्ये ३४५ तर वार्ड क्रमांक तीनमध्ये ३५८ मतदार आहेत. नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येण्याकरिता ५०० मतदारांची अट आहे. ग्रामपंचायत टिकविण्याकरिता व राजकारण शाबुत राहण्याकरिता ही सर्व अनियमितता सुरू असल्याचे दिसून येते. नवीन मतदार यादी तयार करणे, मृत्यू तथा गाव, शहर सोडून गेलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळणे ही कामे निवडणूक अधिकाऱ्यांची आहेत. अधिकारी तथा संबंधित कर्मचारी कार्यालयात बसून ही सर्व यादी अद्यावत करीत असल्याचे येथे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
परप्रांतात वास्तव्य असणाऱ्यांची नावे मतदार यादीत
By admin | Updated: July 8, 2014 23:18 IST