आज आषाढी एकादशी : वारकऱ्यांचे अधिष्ठानभंडारा : ‘‘वारी पंढरीची निघे देहूहून, विठ्ठलाची धून झाला आसमंत’ पांडूरंग धनी, पांडूरंग मनी, जागृती स्वप्नी पांडूरंग’’ महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठोबाची उद्या सोमवारी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक आजही पंढरपूरची वारी करतात. भंडारा येथील संताजी वॉर्ड स्थित 'श्रीविठ्ठल-रुक्माई सार्वजनिक देवस्थानात भाविकगण दर्शनासाठी गर्दी करणार आहे. विठूरायाचे हे मंदिर भक्तांसाठी एक अधिष्ठान स्थळ आहे. माहितीनुसार मंदिर असलेल्या परिसरात पुरातण पांचाळ समूहातील नागरिकांची वस्ती होती. याच समुहातील भाविकांनी या मंदिराची स्थापना केली असावी अशी माहिती आहे. या मंदिरात विठ्ठल-रुख्माई, श्री दत्त भगवान व महादेवाची पिंड आहे. छोट्याश्या परिसरात असलेले हे मंदिर अतिशय सुबक पध्दतीने बांधकाम केलेले आहे. मंदिरात प्रवेश करताच चंचल मन ही एकाग्रचित्त होते. विठ्ठलाच्या मुर्तीचे दर्शन घेताच मन पवित्र होवून जाते. या मंदिर देवस्थानात विश्वस्त समिती असून त्यात नऊ सदस्य आहेत. या मंदिराचे पौराहित्य श्रीमती प्रभावती नक्षुलवार ह्या अविरतपणे करत आहेत. विठ्ठलाच्या भक्तीशिवाय जिवन अपूर्ण आहे, असे त्या म्हणाल्या. आषाढी, कार्तिक एकादशीलाच नव्हे, तर महिन्याचे प्रत्येक एकादशीला या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. येथे सदैव विठ्ठलभक्तांची मांदियाळी दिसून येते. उद्या २७ जुलै रोजी सकाळी श्री विठ्ठल रुख्मीणी अभिषेक, महापूजा व महाआरती करण्यात येणार आहे. दुपारी भजन, किर्तन व त्यानंतर महाप्रसादाने धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे विनोद नक्षुलवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
'विठ्ठल-रुक्माई' मंदिर वारकऱ्यांचे श्रद्धास्थान
By admin | Updated: July 27, 2015 00:44 IST