भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या वीज धोरणाचा निषेध म्हणून समितीतर्फे गांधी चौक भंडारा येथे वीज बिलांची होळी करण्यात आली. याप्रसंगी समितीचे जिल्हा अध्यक्ष अॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांनी सांगितले की, विदर्भातील शेतकऱ्यांची जमीन बळकावून येथील शेतीचे पाणी व कोळसा वापरून महाराष्ट्राच्या ६० टक्के वीजेची निर्मिती होत असली तरी विदर्भातील शेतीला १६ तासांचे भत्तरनियमन केले जाते. त्यामुळे कृषी पंपांना वीज नाही. मागणी करूनही कृषीला वीज जोडणी नाही.ग्रामीण जनता रात्रभर अंधारात राहते. लहान व मोठे उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात २४ तास विदर्भाची वीज वापरून तेथील कारखाने सुरू आहेत. शहरे प्रकाशाने लखलखतात. एक युनिट वीज तयार करण्यासाठी ७.५० लीटर पाणी लागते. आणि एवढी येथील साधन संपत्ती वापरून विदर्भाच्या वाट्याला भयंकर प्रदूषण, फुफुसाचे व कॅन्सर सारखे आजार, वायू व पाणी प्रदूषण, शेतीची नापिकी, बेरोजगारी इत्यादी समस्या येत आहेत. त्यात भर म्हणून आणखी ४० वीज प्रकल्पाना नव्याने परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच विदर्भाला विषारी वायूचे गॅस चेंबर बनवण्याचा पश्चिम महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. प्रति युनिट वीज निर्मितीसाठी सध्या २.५० पैसे खर्च येतो. परंतू येथील जनतेला जवळपास ६.५० रूपये व त्यापेक्षा अधिक दराने बिल आकारणी होते. तसेच वीज गळती व वीज चोरी यांचा भुर्दंड ही प्रमाणिक जनतेला सोसावा लागत आहे. एकंदरीत महाराष्ट्र शासन विदर्भातील जनतेच्या मुळाशी उठले आहे आणि त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होणे हे विदर्भातील प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे. याप्रसंगी माजी आमदार मधुकर कुकडे यांनी सामान्य जनतेला विदर्भाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येवून वीज बिलांची होळी करण्यात आली. या सभेचे संचालन रमाकांत पशिने यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष अर्जून सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी वासुदेवराव नेवारे, गणेश धांडे, मार्कंड नंदेश्वर, अविनाश पनके, युवा अध्यक्ष तुषार हट्टेवार, महिला अध्यक्ष मंजुषा बुरडे, प्रसिद्धी प्रमुख तुळशीदास गेडाम, भंडारा तालुका अध्यक्ष राकेश नशिने, शहर अध्यक्ष अरविंद ढोमणे उपाध्यक्ष केशव हुड, दामोधर क्षिरसागर, हनुमंतराव मेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वीज बिलांची होळी
By admin | Updated: August 5, 2015 00:45 IST