लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील वलमाझरी या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ‘लस’ घेऊन जिल्ह्यातील दुसरे व तालुक्यातील पहिले गाव होण्याचा बहुमान पटकविला आहे. सर्व ५४२ लाभार्थ्यांनी लस घेतली असून शंभर टक्के लसीकरण झालेले दुसरे गाव ठरले आहे. ग्रामस्थांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे तसेच तहसीलदार रमेश कुंभरे यांनी कौतुक केले आहे. वलमाझरी गावाची लोकसंख्या ७९० असून पात्र लाभार्थी संख्या ५४२ एवढी आहे. पात्र लाभार्थ्यांनी कोविड-१९ लसीचा पहिला डोस घेतला आहे.दुसरा डोस घेणारे लाभार्थी १३७ असून ४०५ लाभार्थी त्यांच्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतीने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी केली आहे. सरपंच,सदस्य व इतर पदाधिकारी तसेच ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पोलीस पाटील व इतर कर्मचारी यांनी याबाबत समूहाने काम केले. ग्रामपंचायत स्तरावर पदाधिकारी व कर्मचारी तसेच युवावर्ग यांचे गट करण्यात आले. या सर्व गटामध्ये लसीकरणासाठी शिल्लक असलेली लाभार्थी यादी विभागून देण्यात आली. सर्व गटांना लसीकरणाचे उद्दिष्टे निश्चित करून देण्यात आली. वलमाझरी येथे लसीकरणाचे चार शिबीर घेण्यात आले.यासाठी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे, सदस्या शोभा कंगाले, छाया कापगते, ग्रामसेवक नरेश शिवणकर, मंडल अधिकारी शरद हलमारे, तलाठी मनीषा उइके, पोलीस पाटील शंकर कापगते, आशासेविका सुलोचना कापगते, अंगणवाडी सेविका चंद्रकला कापगते ,मुख्याध्यापक आनंदराव शहारे, सहायक शिक्षक प्रमोद बोरकर स्वस्तधान्य दुकानदार भोजराम लांजेवार, कृषि सखी दक्षिणा गजभिये,संगणक ऑपरेटर प्रबुद्ध नागदेवे, युवावर्ग विनोद कंगाले, गुडी कापगते, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश कंगाले, गणेश कंगाले यांचे उत्तम सहकार्य लाभले. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा अंतर्गत उपकेंद्र पिंडकेपार केंद्राचे डॉ. संदीप तिडके, परिचारिका पविता मोटघरे , कल्पना परटक्के व त्यांच्या चमूने यशस्वीपणे सहकार्य केले.
प्रेरणादायी- साकोली तालुक्यातील वलमाझरी गावात सर्वच लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजही अनेक गावात लस घेतल्यामुळे अनर्थ होतो अशी संभ्रमता कायम आहे. वलमाझरी येथील नागरिकांच्या पुढाकाराने या संभ्रमतेला फाटा देण्यात आला आहे. अन्य गावासमोर प्रेरणादायी व आदर्श स्थापीत करण्यात आला आहे. यावरुनच अन्य गावांनी बोध घेण्याची गरज आहे.