लाखांदूर तालुक्यातील प्रकार : रोहयोची कामे बंद ठेवण्याची मागणीविरली (बु.) : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सर्वत्र सुरु झालेली आहेत. या कामाकडे मजूरवर्ग आकर्षित झाल्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी शेतातील रब्बी हंगामातील कामे खोळंबली आहेत. दरम्यान दोन आठवडे रोहयोची कामे बंद ठेवावी किंवा श्ोतीकामांचा या योजनेत समावेश करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.येथे रोहयोअंतर्गत नाला सरळीकरणाचे काम सुरु असून या कामावर २०० मजुर कार्यरत आहेत. सद्यास्थितीत रब्बी पिकांच्या कापणी व मळणीचा हंगाम सुरु आहे. त्याचप्रमाणे उन्हाळी धानाच्या रोवणीची कामेही सुरु आहेत. मात्र, मजुरवर्ग रोहयोकडे वळल्यामुळे या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. लहान शेतकरी आपल्या कुटूंबियासह कसेबसे हे काम आटोपत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी धडपड चालविली आहे. मात्र, त्या गावांमध्येही रोहयो कामे सुरु होत असल्यामुळे हा मार्गही बंद होण्याची चिन्हे आहेत. सध्याचे ढगाळ वातावरण आणि नुकत्याच बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.दरम्यान येथील काही शेतकऱ्यांनी शेतीचा हंगाम संपेपर्यंत कीमान २ आठवडे रोहयोची कामे बंद ठेवण्याची विनंती ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. याची मजूरांना कुणकुण लागताच सुमारे २०० मजुरांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन रोहयोचे काम सुरु ठेवण्यासाठी सरपंचांना निवेदन दिले. परिणामी येथील शेतकरी व शेतमजूरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिस्थितीवर उपाय म्हणून रोहयोच्या कामामध्ये शेतीकामाचा समावेश करावा अशी सुचना विलास महावाडे, राजेश महावाडे, शिवाजी ब्राम्हणकर, पोलीस पाटील एकनाथ भेंडारकर, संजू कोरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. सदर उपाययोजनेमुळे शेतीकामासाठी मजूर आणि मजूरांना काम अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
मजुरांअभावी खोळंबली शेतीची कामे
By admin | Updated: March 5, 2016 00:42 IST