तज्ज्ञांचे मार्गदर्शन : पटेल महाविद्यालयात विविध वाङ्मय मंडळाचे उद्घाटनभंडारा : भाषा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जशी आवश्यक आहे तशीच अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये रोजगार प्राप्त करण्याच्या दृष्टीने भाषेचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे विचार प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी विविध वाङ्मय मंडळाच्या उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले. त्याचप्रमाणे नावीन्यपूर्ण कल्पनेतून जागतिक व्यवसायात यशस्वीपणे पाय रोवता येते हे सिद्ध करताना अनेक यशस्वी उद्योगपतींचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना क्रियाशील व सृजनशील होण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले.ज.मु. पटेल महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चारही भाषेच्या वाङ्मय मंडळाचे संयुक्त उद्घाटन प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.अमोल पदवाड यांनी केले. तर संचालन व आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा.सुमंत देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी यश ढोमणे यांची रायगड ते तोरणा ही लघुचित्रफीत दाखविण्यात आली व त्यानंतर अश्रूंची झाली फुले हे अभ्यासक्रमाला असलेले नाटक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.कार्यक्रमासाठी डॉ.मीनाक्षी जोशी, डॉ.कार्तिक पनीकर, डॉ. उज्ज्वला वंजारी, डॉ.उमेश बन्सोड व प्रा.ममता राऊत यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रोजगाराभिमुख शिक्षणात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व
By admin | Updated: October 26, 2015 00:56 IST