तुमसर : रस्ता ओलांडून पलीकडे जाणाऱ्या अजगराला एका युवकाने पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा पायाचा चावा घेतला मदतीकरिता दुसरा युवक धावून गेल्यावर त्याने अजगराचा तोंड पकडण्याचा प्रयत्नात त्याचा हाताचा चावा अजगराने घेतला. अशाही स्थितीत त्या युवकाने अजगराचे तोंड सोडले नाही. प्रसंगावधान ओळखून उपस्थित एकाने वनविभागाला संपर्क केला. वन कर्मचाऱ्यांनी येऊन अजगराला एका पोत्यात जेरबंद केले. दोन्ही युवकावर उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. सदर घटना तुमसर शहरात गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली.शहरातील श्रीराम नगर रेल्वे फाटकाशेजारी सुमारे १० ते १२ फुटाचा भला मोठा अजगर रस्ता ओलांडतांनी मंगेश गेडाम (२७) रा. आंबेडकर वार्ड यांना दिसला. अजगराला जीवदान मिळावे म्हणून त्यांनी अजगराची प्रथम शेपटी पकडली. परंतु अजगर तावडीत न येता उलट त्याने मंगेशच्या पायाचा चावा घेतला. मंगेशच्या मदतीकरिता त्याचा मित्र रोशन देशमुख (२८) नेहरूनगर धावून गेला. अजगर पुन्हा दंश करू नये म्हणून रोशनने त्याचा तोंड पकडण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसल्याने रोशनच्या हाताला अजगराने चावा घेतला. पुन्हा दंश करू नये म्हणून रोशनने अजगराचे तोंड सोडले नाही. हा थरार शेकडो नागरिक बघत होते. गर्दीतील हेमराज तलमले यांनी वनकर्मचारी राऊत यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून माहिती दिली. राऊत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचारी राऊत, हेमराज तलमले, समीर शेख, करण, तौसीक शेख यांच्या मदतीने एका पोत्यात अजगराला जेरबंद केला. रात्रभर वनकार्यालयात ठेवून दुसऱ्या दिवशी त्याला जंगलात सोडले. जखमी रोशन देशमुख व मंगेश गेडाम यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगेश गेडाम यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली तर रोशन देशमुखवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजगर हा बिनविषारी साप असल्याने जखमींना धोका नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान झुडपी जंगल वाढले असून बाराही महिने पाणी साचले राहते. यामुळे या निर्जन परिसरात जलचर तथा सापांचे वास्तव्य येथे आहे. (तालुका प्रतिनिधी)
अजगराच्या हल्ल्यात दोन जखमी
By admin | Updated: November 1, 2014 00:42 IST