लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवघ्या सात दिवसात तब्बल अडीच हजार कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची पाचावरण धारण बसली आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत असून गुरुवारी तब्बल ७३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. कोरोना संसर्ग सुरू झाला तेव्हापासूनची ही सर्वाधिक आकडेवारी होय. जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ३७८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १४ हजार ८७१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले तर ३४४ जणांचा बळी गेला. सध्या ३,१६३ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दररोज स्फोट होत असून रोजची आकडेवारी विक्रमी येत आहे. गत सात दिवसात २ हजार ५१३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. केवळ ३० मार्चचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी २०० च्या वरच रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवार २६ मार्च रोजी २८५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २७ मार्चला २०० तर २८ मार्च रोजी रुग्णसंख्या दुप्पट होऊन ४३९ झाली. २९ मार्च रोजी हा आकडा २५७ वर पोहोचला. धूलिवंदनामुळे चाचण्या न झाल्याने त्या दिवशी केवळ ३३ पाॅझिटिव्ह आढळून आले. ३१ मार्च रोजी ५६६ रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी सर्वाधिक ७३३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचणीची संख्या वाढविल्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. गुरुवारी ६ हजार २४७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ७३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. त्यामध्ये भंडारा तालुक्यात ३२०, मोहाडी ६१, तुमसर १२७, पवनी ९४, लाखनी ८०, साकोली ३४, लाखांदूर १७ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी १११ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत १४ हजार ८७१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. भंडारा तालुक्यातील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ३४४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या ३,१६३ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यात ३१६३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यातील सर्वाधिक १,४४७ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी २११, तुमसर ३८७, पवनी ५३८, लाखनी ३४२, साकोली १६४, लाखांदूर ७४ रुग्णांचा समावेश आहे.
४५ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरणजिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील १२८ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पहिल्या दिवशी कुठेही लसीचा तुटवडा जाणवला नाही. नागरिक या ठिकाणी लसीकरणासाठी येत असल्याचे दिसून येत होते. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडारा तालुक्यातील सिल्ली, मानेगाव बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.