साकोली : साकोली, मोहाडी व तुमसरसह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. हा ऊस देव्हाडी येथील वैनगंगा शुगर अॅन्ड पावर कारखान्याला विकला. मात्र शेतकऱ्यांचे २० कोटी रूपयांचे चुकारे कारखान्याकडून प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. २०१३-१४ या गाळप हंगामात परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील ऊस वैनगंगा साखर कारखान्याला दिला. परिसरातील ऊस उत्पादक, वाहतुकदार व कोळी मालक अशा दोन हजार शेतकऱ्यांवर त्यांचे चुकारे न मिळाल्याने आर्थिक संकट ओढविले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा कारखान्याचे उपाध्यक्ष दादा टिचकुले यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी व त्यांच्या संचालक मंडळांनी टाळाटाळीचे उत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांवर उमासमारीचे संकट ओढवले आहे. त्यांनी मंगळवारला टिचकुले यांची थकित चुकाऱ्याबाबत भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला ३१ आॅगस्ट पर्यंत संपूर्ण चुकारे देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. ३१ आॅगस्टपर्यंत साखर कारखाना प्रशासनाने चुकारे न दिल्यास संघटनेच्या वतीने १ सप्टेंबर रोजी शेतकरी, वाहतुकदार व टोळी मालकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिष्टमंडळातर्फे देण्यात आलेला आहे. शिष्टमंडळात पतीराम समरीत, यादोराव कापगते, दिपक कापगते, मधूकर कापगते, प्रमोद कापगते, राजकुमार लंजे, नारायण लंजे, रेशिम लोधीकर, भारत गायकवाड, रतिराम कापगते, ज्ञानेश्वर लांजेवार, सुनिल लोगडे आदीचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
ऊस उत्पादकांचे २० कोटींचे चुकारे थकीत
By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST